पुण्यात मोठा दरोडा टाकण्याचा प्लॅन फसला; ‘चूहा गँग’च्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
योगेश पांडे/वार्ताहर
पुणे – पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, पुण्यात दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत आहेत. यामुळे नागरिकांसोबतचं पोलिसही हैराण झाले आहेत. अशातच आता पुणे शहरातून तडीपार केलेल्या ‘चूहा गँग’ला दरोड्याच्या तयारीत असताना पोलिसांनी अटक केली आहे. आंबेगाव पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्यांच्याकडून साहित्यही जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार धनाजी धोत्रे यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून तौसिफ जमीर सय्यद उर्फ चुहा (२८) सुरज राजेंद्र जाधव (३५), मार्कस डेविड (२९) आणि कुणाल रमेश जाधव (२५) आहे. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि मॅफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ, कोयता, डिजिटल वजन काटा आदी साहित्य जप्त करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तौसिफ सय्यद याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यास मकोका विशेष न्यायालयाने पुणे शहरातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. त्याच्यावर दंगल घडविणे, दरोडा, जबरी चोरी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याला २०२० मध्ये ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत स्थानबद्धही केले होते. त्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये दोन वर्षांसाठी शहरातून तडीपार केले होते. दरम्यान, तौसिफ सय्यद आणि चुहा गँगचे सदस्य दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती आंबेगाव पोलिसांना मिळाली. त्यांनी सापळा रचून चौघांना पकडले. त्यांचा एक साथीदार फरारी झाला आहे. आंबेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुरेश शिंदे व मोहन कळमकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.