दोन पत्नींच्या गरजा पूर्ण करू शकत नसल्याने मुंबईत एका व्यक्तीने घातला हैदोस
आरोपी विरुद्ध आत्तापर्यंत १४ पेक्षा जास्त चोरीचे गुन्हे दाखल; चोरीचे १८ फोन जप्त करण्यात पोलीसांना यश
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – मुंबईतील मालाड पोलिसांनी एका चोराला अटक केली. या चोरानं चोरी करण्यामागची कारणं सांगताच पोलिसांना देखील धक्का बसला. दोन पत्नींच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी ही व्यक्ती चोर बनली. त्याने सांगितले की, मी माझ्या दोन्ही पत्नींवर खूप प्रेम करतो. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी चोर बनलो. तसेच त्याने पत्नींसाठी साथीदारांच्या मदतीने टोळी तयार करून छोटे गुन्हे देखील केले आहेत. मोहम्मद कासीम शेख उर्फ अतीक – ४१ असं या आरोपीचं नाव आहे. त्याच्या विरुद्ध आत्तापर्यंत १४ पेक्षा जास्त चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तपासात अतीकचे दोन विवाह झाल्याचे स्पष्ट झाले. तो त्याच्या दोन्ही पत्नींवर खूप प्रेम करतो. पण बेरोजगार असल्याने तो त्याच्या दोन्ही पत्नींच्या रोजच्या गरजा पूर्ण करू शकत नव्हता. त्यामुळे तो चोरी करायला लागला आणि तो मोबाइल, पर्स चोरी करू लागला. अतीकला अटक केल्यानंतर पोलीस चोरीच्या चार घटनांचे गूढ उकलू शकले आहेत.
मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतीक स्वतः बेरोजगार होता, पण तो दुसऱ्यांना नोकरी देण्याचे अमिष दाखवत होता. यासाठी तो मोबाइल असलेल्या बेरोजगार लोकांच्या शोधात फिरत असे. ९ जुलै रोजी असाच एक तरुण अतीकच्या जाळ्यात अडकला. हा तरुण कामासाठी मालाडमध्ये फिरत होता. अतीकने त्याला एका दुकानात नोकरी लावतो असं सांगत फसवले. एफ आय आर नुसार, किरकोळ संवादानंतर अतीकने पीडित तरुणाचा विश्वास संपादन केला. मग एकाला अर्जंट कॉल करायचा आहे, असे सांगत तरुणाकडून मोबाईल घेतला. मग फोनवर बोलत तो थोड्या अंतरावर चालत गेला आणि अचानक नाहीसा झाला. काही वेळेनंतर अतीक परत न आल्याने पीडित तरुणाने मालाड पोलिसांत तक्रार केली.
झोन ११ चे डीसीपी आनंद भोईटे यांनी सांगितले की, “काही दिवसांपासून या पद्धतीचा वापर करून फोन, पर्स चोरीला जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पीआय विजय पन्हाळे आणि पीआय संजय बेदवाल यांच्या नेतृत्वात एक पथक स्थापन करण्यात आले. सीसीटीव्ही, गुप्तहेर आणि तांत्रिक माहितीच्या आधारे जाळे पसरवण्यात आले. यात एसव्ही रोडवर या आरोपीला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने गुन्हा कबूल केली. तसेच फसवणूक करून चोरीबाबत अनेक घटनांविषयी माहिती दिली. मुंबई आणि परिसरात मोबाईल चोरीच्या १४ घटनांबाबत माहिती मिळाली. इतर प्रकरणांचा तपास सुरू आहे. पोलिसांनी अतीककडून चोरीचे १८ फोन जप्त केले. पोलीस तपासात अतीकविरूद्ध मालाड, मरिन ड्राइव्ह, कुलाबा, खार, वांद्रे आणि ठाण्यातील नौपाडा तसेच डोंबिवलीसह अनेक पोलीस स्टेशन्समध्ये १५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.