बाबा सिद्दीकी हत्येनंतर शूटरचा शुभम लोणकर आणि झीशान अख्तरला फोन; मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून खुलासा
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – माजी मंत्री, राजकारणी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येला जवळपास दीड महीना उलटून गेला आहे. दसऱ्याच्या दिवशी १२ ऑक्टोबर रोजी वांद्रे येथील झिशान सिद्दीकीच्या ऑफीसबाहेर तीन हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या केली. या हत्याप्रकरणी दोन शूटर्सना तत्काळ अटक करण्यात आली तर त्यानतर काही कालावधीने इतर अनेक आरोपींना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी, ज्याने गोळ्या झाडल्या तो शिवकुमार गौतम याला काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली. मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून त्याची चौकशी करण्यात येत असून या तपासात शूटर शिवकुमार गौतम कडून महत्वाचा खुलासा झाला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर शिवकुमार गौतम याने हत्येचा सूत्रधार शुभम लोणकर, झीशान अख्तर यांना फोन केला होता, तो त्यांच्याशी किमान १५ मिनिटे बोलला होता, अशी माहिती समोर आली आहे. सिद्दीकींच्या खुनाच्या काही तासानंतर शुभम लोणकर आणि झीशान अख्तर यांच्या सांगण्यावरून शिवकुमारने त्याचा फोन ठाणे स्टेशनजवळील नाल्यात फेकून दिला होता. त्याने जेथे फोन फेकून दिला होता, त्या ठिकाणी गुन्हे शाखेचे अधिकारी फोनचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
एवढेच नव्हे तर शुभम लोणकर याने शिवकुमार याला ठाण्याहून पुण्याला जाणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये चढण्यास सांगितले होते. हत्येनंतर शिवकुमार याने शुभम लोणकरला फोन केला होता. त्यावेळी शुभमने शिवासोबत अटक केलेला आरोपी अनुराग कश्यपला ला आश्रय देण्याची आणि नेपाळला पळून जाण्यास मदत करण्याची सूचना केली होती. दरम्यान याच घटनेचा तपास सुरू असताना रफिक शेख याला पुण्यातून अटक करण्यात आली असून त्याच्या घरातून २० जिवंत काडतुसे सापडली. याप्रकरणी गुन्हे शाखेने ८५ जिवंत काडतुसे आणि ५ पिस्तुलेही जप्त केली आहेत.