राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर प्राणघातक हल्ला, भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप

Spread the love

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर प्राणघातक हल्ला, भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप

योगेश पांडे/वार्ताहर 

नागपूर – विधानसभा निवडणुकीच्या मतदानास अवघे काही तास शिल्लक राहिले असताना, काटोलमध्ये माजी गृहमंत्री, आमदार अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यात देशमुख जखमी झाले असून त्यांना काटोल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. काटोल मतदारसंघातील निवडणूक अटीतटीची बनत चालली आहे. अनिल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शप) उमदेवार सलील देशमुख यांच्या प्रचारासाठी सोमवारी नरखेड येथे गेले होते. येथील सभा आटोपून देशमुख हे कारने परत काटोलकडे यायला निघाले. जलालखेडा मार्गावरील बेलफाट्याजवळील गतीरोधकावर, त्यांच्या कारची गती कमी झाली. त्याचा फायदा घेत, तोंडाला कापड बांधलेले तीन चार जण तेथे आले. त्यांनी कारवर दगडफेक केली. यात देशमुख यांच्या डोक्याला मार लागला. हा हल्ला होताच, देशमुख यांच्या कारमागे असलेल्या अन्य कारमधील कार्यकर्ते कारमधून बाहेर आले. त्यांना बघताच दगडफेक करणारे शेतातून पसार झाले.

जखमी देशमुख यांना काटोलमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच काटोल पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी माहिती घेत दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरू केला. ज्यांनी कोणी अनिल देशमुख यांच्यावर हल्ला केला त्यांना तातडीने अटक केली पाहिजे. नाही तर मी स्वत: रस्त्यावर उतरून आंदोलन करेन असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. लोकशाहीचे धिंडवडे उडवले जात आहेत. याचे उदाहरण आज निवडणुकीच्या सांगता सभेवरून घरी परतताना राज्याचे माजी गृहमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यातून समोर आले. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon