ठाणे हादरलं! चॉकलेटचं आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार, आरोपी अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – राज्यात महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वेगाने वाढ होत आहे. अशीच एक घटना ठाण्यामध्ये सात वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याची समोर आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे. रमेशकुमार रामरक्षा जैस्वाल (२०) असं आरोपीचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीने सात वर्षांच्या मुलीला चॉकलेट आणि आईस्क्रीमचं आमिष दाखवलं, त्यानंतर मीरा रोड परिसरातच असलेल्या एका इमारतीच्या छतावर चिमुकलीला घेऊन गेला. तिथे रात्रीच्या वेळी आरोपीने चिमुकलीवर अत्याचार केला. ३ नोव्हेंबर रोजी आरोपी रमेशकुमार जैस्वालने हे दुष्कृत्य केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला होता.
पीडितेच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर भारतीय दंड संहितेच्या कलम ६४, ६५(२), ७४ आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आणि सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या दृष्यांनुसार आरोपी ठाणे जिल्ह्याच्या बाहेर फरार झाल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी माहिती घेतली असता, तो उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने आरोपीचं ठिकाण शोधून तिथे जाऊन आरोपीला अटक केली.