पुण्यात हत्तीच्या केसाचे दागिने बनवून विक्री करणार्‍या व्ही. आर. घोडके सराफावर गुन्हा दाखल

Spread the love

पुण्यात हत्तीच्या केसाचे दागिने बनवून विक्री करणार्‍या व्ही. आर. घोडके सराफावर गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे – वन्यजीव प्राण्यांचे कातडे, केस जवळ बाळगणे व त्यांची विक्री करणे हा गुन्हा आहे, असे असताना त्याची जाहिरात करुन हत्तीच्या केसांचे दागिने बनवून त्याची विक्री करणाऱ्या सराफावर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. व्ही. आर. घोडके सराफ, बिझी लॅन्ड इमारत, कुमठेकर रोड असे गुन्हा दाखल झालेल्या सराफाचे नाव आहे.

याबाबत मानक वन्य जीव रक्षक आदित्य विवेक परांजपे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हाताच्या अंगठ्यामध्ये हत्तीचे केस घालणे, ज्याला हत्तीच्या केसांच्या बांगड्या असे संबोधले जाते. ही काही संस्कृतीमध्ये, विशेषत: आफ्रिका आणि आशियाच्या काही भागांमध्ये परंपरा आहे. अनेकांचा असा विश्वास आहे की हत्तीचे केस धारण केल्याने धारण करणार्‍याला शक्ती आणि संरक्षण मिळते. हत्ती हा शक्तीशाली प्राणी आहे. त्याच्या केसांमध्ये काही ताकद असते असे मानले जाते. अंगठी किंवा ब्रेसलेटमध्ये हत्तीचे केस हत्तीचे शौर्य आणि सामर्थ्य दर्शवतात. काळ्या रंगाचा असल्याने तो वाईट नजरेपासून दूर ठेवतो. त्यामुळे ज्या मुलांना वारंवार भयानक स्वप्न पडतात आणि जे इतरांच्या वाईट कंपने प्रभावित होतात त्यांच्यासाठी हे सुचवले आहे. असे असले तरी वन्य जीव संरक्षण कायद्यान्वये हत्तीच्या केसांची विक्री करणे अथवा जवळ बाळगण्यास बंदी आहे.

याबाबत मानक वन्य जीव संरक्षक आदित्य विवेक परांजपे यांनी सांगितले की, घोडके सराफ यांची रेडिओवर जाहिरात ऐकली होती तसेच त्यांची इंटरनेटवर हत्तीच्या केसापासून बनविलेले दागिने अशी जाहिरात पाहण्यात आली. आम्ही एकाला ग्राहक म्हणून त्यांच्याकडे पाठविले. त्याने हत्तीचा केस असलेली चांदीची अंगठी खरेदी केली. ती तपासून पाहिल्यावर त्यात खरोखरच हत्तीचा केस आढळून आला. त्यानंतर आम्ही पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल, विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार व गुन्हे निरीक्षक घोडके यांची भेट घेऊन त्यांना सर्व सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडे सोन्या चांदीच्या अंगठ्या, ब्रेसलेट, कडे, बांगड्या आढळून आले. त्यांच्याकडून हत्तीचा केसही हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक फरताडे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon