कौटुंबीय हिंसाचारातून ज्येष्ठ नागरिकांची सुटका
सौहार्दापूर्ण निर्णय घेऊन न्यायालयाकडून दोन्ही पक्षकारांना दिलासा
रवि निषाद/प्रतिनिधि
घरगुती हिंसाचाराच्या एका गुंतागुंतीच्या प्रकरणात अडकलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या जोडप्यासह समोरील पक्षकारांचीही बाजू ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने सौहार्दपूर्ण निर्णय घेऊन दोन्ही पक्षकारांची दिलासा दिला. सुनेकडून माराहण होत असल्याचा दावा करणारी याचिका पुणेस्थित वृद्ध दाम्पत्यांनी अँड. लुसी मॅसी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात केली होती. त्यावर न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाच्या दालनात दोन्ही पक्षकारांच्या उपस्थित सुनावणी घेतली. पक्षकार (सून) सासू-सासऱ्यांसह पतीलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने अँड. लुसी मॅसी यांनी न्यायालयाच्या निदर्शानास आणून दिला. त्याची दखल घेऊन पक्षकार (सुनेला) सासू सासऱ्यांना मारहाण केल्याबद्दल न्यायालयाने जाब विचारला. त्यांचे वय पाहता त्यांना असे मारणे य़ोग्य नसल्याचेही सांगितले. परंतु, आपल्यालाही मानसिक त्रास, छळवणूकीला सामोरे जावे लागत असल्याचा दावा सूनेकडून कऱण्यात आला. दोन्ही पक्षकारांचे एकमेकांवर कौटुंबीक अत्याचाराचे आऱोप आहेत. पुणे कौटुंबीक न्यायालयात खटलाही सुरू आहे. त्यामुळे त्यांचे समुपदेशन होणे गरजेचे आहे. त्यासाठी दोन्ही पक्षकारांनी तयारीही दर्शवली असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले. यासोबतच सामंजस्याने हा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रपकऱण निकाली लागेपर्यंत दोन्ही पक्षकारांनी विभक्त राहणे योग्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच याचिकाकर्ते वृद्ध दांम्पत्यांनी तसेच त्यांच्या सुनेनेही ते राहत असलेल्या परिसरात अथवा एकमेकांच्या घरी जाऊ नये, अशी अट न्यायालयाने आदेशात नमूद केली आहे. तसेच याचिकाकर्त्यांनी सुनेच्या राहण्यासाठी एक सदानिका शोधून तिची मुलासह राहण्याची व्यवस्था करावी, असे आदेश देऊन सुनावणी २१ ऑक्टोबर रोजी निश्चित केली.
पुण्यात वास्तव्यात असलेल्या वृद्ध दाम्पत्यांचा मुलाचे राज्यस्तरीय बॉक्सर असलेल्या मुलीसोबत लग्न झाले. लग्नांनतर त्यांना मुलगा ही झाला. मुलगा नवी मुंबई कामाला असल्यामुळे वृद्ध दाम्पत्य पुण्याच्या घरी राहत होते. काही दिवसांनी आपल्या मुलाची तब्येत बिघडल्याचा त्याची मानसिक अवस्था बिघडली असल्याचे वृद्द दाम्पत्यांना कळाले. याबाबत सुनेने पतीवर कोणीतरी काळी जादू केल्याचे सांगितले. त्यावर आपला विश्वास नसून मुलाला चांगल्या डॉक्टराची गरज असल्याचे याचिकाकर्त्यांनी सांगितल्यानंतर सासू आणि सुनेकडे खटके उडण्यास सुरुवात झाली. त्याचे रुपांतर मारहाणीत झाले. याचिकाकर्त्यांची सून बॉक्सर असल्याने तिच्या ताकदी पुढे सासू सासऱ्यांचा निभाव लागू शकला नाही. मुलाने सुरुवातीला पत्नीची बाजू घेण्याचा प्रयत्न केला. परंतु,तिच्या या मारहाणीमुळे त्याने तिच्यापासून लांब राहणेच पसंत केले आणि तो आईवडीलांसबोत राहू लागला. पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार दाखल कऱण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनीही काहीच सहकार्य न केल्यामुळे वृद्ध दाम्पत्यांने उच्च न्यायालयात धाव घेतली.