पालिकेच्या कचरावाहू ट्रकच्या धडकेत मुलाचा जागीच मृत्यू; स्थानीकांकडून ट्रकची तोडफोड, चालकाला अटक

Spread the love

पालिकेच्या कचरावाहू ट्रकच्या धडकेत मुलाचा जागीच मृत्यू; स्थानीकांकडून ट्रकची तोडफोड, चालकाला अटक

योगेश पांडे/वार्ताहर 

मुंबई – गोवंडी परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या एका नऊ वर्षांच्या मुलाला मंगळवारी सकाळी मुंबई महानगरपालिकेच्या कचरावाहू ट्रकने धडक दिली. या अपघातात सदर मुलाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी कचरावाहू ट्रकची तोडफोड केली. शिवाजी नगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून ट्रक चालकाला अटक केली. गोवंडीमधील बैंगनवाडी सिग्नल परिसरात मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास हा अपघात झाला. या परिसरात राहणारा हमीद – ९ सकाळी ११ च्या सुमारास मदरशामधून घरी जात होता. रस्ता ओलांडत असताना अचानक भरधाव वेगात आलेल्या पालिकेच्या कचरावाहू ट्रक हमीदला धडक दिली. या अपघातात हमीदचा जागीच मृत्यू झाला.

हमीदच्या अपघाताचे वृत्त वाऱ्याच्या वेगाने परिसरात पसरले. त्यामुळे संतप्त झालेले नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. त्यांनी कचरावाहू ट्रकची तोडफोड केली. घटनेनंतर शिवाजी नगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली जमावाला पांगवले. त्यानंतर पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. गेल्या काही वर्षांत या परिसरात अशाच प्रकारे अनेक अपघात झाले असून या अपघातांमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. या परिसरातील बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई करावी, तसेच येथे वाहतूक पोलीस तैनात करावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon