गोंदियामध्ये बाप आणि मुलाच्या नात्याला काळीमा; दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या बापाचा पोटच्या मुलाकडून खून
योगेश पांडे/वार्ताहर
गोंदिया – आपल्या लेकराला कधीही काही कमी पडू नये म्हणून बाप पोरांसाठी वाटेल ते कष्ट करायला तयार असतो. पण गोंदियामध्ये बाप आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या बापाच्या डोक्यात वार करून मुलाने खून केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या खैरबोडी गावात ही घटना घडली आहे. एका मुलाने आपल्या दारुड्या बापाची हत्या केल्याची घटना घडली आहे. रमेश पारधी – ५० असं मृत वडिलांचं नाव आहे. तर आनंद पारधी (२४) असं आरोपी मुलाचं नाव आहे.
मृत रमेश आणि त्याची पत्नी चंद्रकला पारधी आणि २ मुलं आनंद आणि अंकुश यांच्यासह खैरबोडी इथं राहतात. रमेशला दारूचे व्यसन होतं. दरम्यान, मद्यधुंद अवस्थेत तो नेहमी पत्नी चंद्रकला आणि मुलगा आनंद यांच्याशी वाद घालायचा. घटनेच्या दिवशी रमेशचा चंद्रकलासोबत वाद झाला. त्यानंतर मृत रमेश आणि आरोपी आनंद यांच्यात वाद सुरू झाला. यावेळी दोघानी एकमेकांना मारहाण केली. या मारहाणीत आरोपी मुलगा आनंद याने वडिलांच्या डोक्यात जोरदार लाकडी दांडक्याने प्रहार केला. या घटनेत रमेशच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन रमेशचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मृताच्या पत्नीने कुटुंबीय आणि शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. घटनेची नोंद तिरोडा पोलिसांनी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय कवडे करीत आहेत.