माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला प्रकरणी अविनाश जाधव मुख्य आरोपी, ३२ महिला व १२ पुरुष कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरील हल्ल्या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ठाणे पोलिसांनी या प्रकरणी मनसेच्या ३२ महिला व १२ पुरुष कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावर हल्ला करण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी जाधव यांच्यावर मुख्य आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यात शिवसेना भगवा सप्ताह सांगता सोहळ्याप्रसंगी गडकरी रंगायतननध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रातील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर काल ठाण्यात मनसैनिकांनी हल्ला केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपारी फेकल्यानंतर ठाण्यात मनसैनिक आक्रमक झाले. मनसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर टमाटे, शेण, नारळ फेकले. त्यामुळे ठाण्यात मोठा तणाव निर्माण झाला होता. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर आता पोलीस सतर्क झाले असून पोलिसांनकडून उद्धव ठाकरेंवरील हल्ला प्रकरणी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ठाणे पोलिसांनी या प्रकरणी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना मुख्य आरोपी ठरवत त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळत आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव हे मुख्य आरोपी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या एफआयआर दाखल केल्या आहेत, ज्यामध्ये एकूण ४४ जणांवर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या एफआयआरमध्ये कलम १८९ (२) ,१९० ,१९१ (२) ,१२६ (१), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३७ पोट कलम (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर दुसऱ्या एफआयआरमध्ये ३२ महिलांसोबत १२ पुरुष कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना रात्री सोडण्यात आले. त्यांच्यावर कलम ६१ (२) १२५,१८९(२) ४९ ,१९०, १९१ (२), ३२४ (४) पोलीस अधिनियम १९५१ कलम ३७ पोट कलम (१), (३) सह १३५ प्रमाणे अविनाश जाधव यांच्यासह मनसे कार्यकर्ते प्रीतेश मोरे, आकाश पवार, अरुण जेटलू, मनोज चव्हाण यांना आरोपी करण्यात आले आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.