लोणावळ्यात तीन पत्ती जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, १४ जणांवर गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
लोणावळा – पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहरात अनैतिक धंद्याना देखील ऊत आला आहे. लोणावळा तुंगार्ली भागातील एका बंगल्यात पैशांची दर्शनी किंमत असलेल्या कॉइनचा वापर करत तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या १४ जणांवर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगार खेळणारे सर्वजण मुंबई भागातील असून त्यांच्याकडून २ लाख ९६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई विकास कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १४ जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतीबंधक अधिनियम १२ (अ) प्रमाणे १४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तुंगार्ली भागातील एका सोसायटी मधील बंगल्यात काही लोक पैशाची दर्शनी किंमत असलेल्या कॉईन चा वापर करून तीन पत्ती जुगार खेळत असलेली माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी जाऊन पोलिसांनी पडताळणी केली असता मुंबई भागातील १४ जणांचा एक समूह त्या ठिकाणी जुगार खेळत असल्याचे दिसून आले. याप्रकरणी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शिंदे हे पुढील तपास करत आहेत.