अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी २ कोटींची लाच मागणाऱ्या महापालिका अधिकाऱ्याला ७५ लाख घेताना रंगेहाथ अटक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबई महानगर पालिका अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. मंदार तारे असं या अधिकाऱ्याचे नाव असून ७५ लाख रुपयांची लाच घेताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तारे हा अंधेरी पूर्व येथील के पूर्व वॉर्डमध्ये कामाला आहे. तारे याने २ कोटी रुपयांची लाच मागितली होती त्यापैकी ७५ हजारांची रक्कम स्वीकारताना तारेला अटक करण्यात आली आहे. ३१ जुलै रोजी तक्रारदाराने तारे याच्याविरोधात तक्रार केली होती. तक्रारदाराची अंधेरी के पूर्व प्रभागामध्ये एक इमारत आहे. ही इमारत चार मजल्यांची असून त्यातील वरील दोन मजले हे अनधिकृत आहेत. या दोन मजल्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार होती.ही कारवाई टाळण्यासाठी आणि फ्लॅट खरेदीविक्रीनंतर अनधिकृत बांधकामासाठी सहकार्य देण्यासाठी तक्रारदाराकडे तारे याने लाच मागितली होती. तडजोडीअंती २ कोटी लाचेची रक्कम ठरवण्यात आली होती. या रकमेतील ७५ लाखांची रक्कम आधी देण्याचे ठरले होते.लाच द्यायची इच्छा नसल्याने हा व्यवहार ठरल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांत धाव घेतली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचला आणि मंदार तारे याला ७५ लाखांची रक्कम स्वीकारताना अटक केली.