डहाणू रणकोळ आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना विषबाधा; ८ जणींची प्रकृती चिंताजनक तर २० विद्यार्थिनी देखरेखीखाली
योगेश पांडे / वार्ताहर
पालघर – रात्री जेवण केलं आणि सगळे विद्यार्थी शांत झोपले, अचानक मध्यरात्रीनंतर विद्यार्थिनींना पोटात दुखायला लागलं आणि उल्ट्या जुलाब सुरू झाले. विद्यार्थिनींना आश्रम शाळेत याची माहिती दिली आणि त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पालघर जिल्ह्यातील डहाणू इथे एक मोठी घटना समोर आली आहे. तालुक्यातील रणकोळ आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना विषबाधा झाली आहे. २८ विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची माहिती मिळाली आहे. डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या रणकोळ आश्रम शाळेत हा धक्कादायक प्रकार समोर आला.
२८ विद्यार्थिनींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पहाटे पाच वाजताच्या सुमारास उलटी आणि जुलाब सुरू झाल्याने २८ विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल केलं. जेवणातून आणि पाण्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. ८ विद्यार्थिनींची प्रकृती थोडी चिंताजनक आहे. तर २० विद्यार्थ्यांना इंजेक्शन देऊन देखरेखीखाली ठेवलं आहे. सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे. ८ विद्यार्थ्यांचे रक्ताचे, उल्टीचे आणि स्टूलचे सँपल तपासणीसाठी पुढे पाठवण्यात येणार आहेत. त्यातून अधिक माहिती मिळू शकेल असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या विद्यार्थिनींना नेमकी विषबाधा कशातून झाली या प्रकरणी आता चौकशी होणार का? विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळ कुणी केला याबाबत काय निर्णय घेतला जाणार? हे पाहावं लागणार आहे. या घटनेमुळे डहाणू तालुक्यात खळबळ उडाली आहे.