डॉन अबू सालेमला नाशिकरोड सेंट्रल जेलमधून सुरक्षित स्थळी हलवले, प्रचंड बंदोबस्त
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – कुख्यात गँगस्टर व दहशतवादी अबू सालेमला काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून कडेकोट बंदोबस्त आणि कमालीची गोपनीयता पाळत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले होते. कारागृहातील अंडासेलमध्ये त्याला ठेवण्यात आले होते. मात्र बुधवारी रात्री मोठ्या पोलीस बंदोबस्तात नाशिकरोड रेल्वे स्थानकावरून एका रेल्वेने अबू सालेमला दुसरीकडे हलवण्यात आले आहे. अबू सालेम हा मुंबई साखळी बॉम्ब स्फोटातील प्रमुख आरोपी आहे. नाशिकरोड कारागृहातील अंडासेलमध्ये अबू सालेमचा महिनाभरापासून मुक्काम होता. तळोजा कारागृहातून सुरक्षेच्या कारणास्तव अबू सालेमचा नाशिकच्या कारागृहात हलवण्यात आले होते. अबू सालेमला महत्त्वपूर्ण सुनावणीसाठी कोर्टात हजर केले जाणार आहे. त्यासाठीच कडेकोट बंदोबस्तात एका मोठ्या शहरात हलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
बुधवारी मध्यरात्री नाशिकरोड कारागृहाबाहेर डॉन अबू सालेमला काढण्यात आले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसंच, ब्लॅक कॅट कमांडोदेखील सुरक्षेच्या कारणास्तव तैनात करण्यात आले होते. नाशिकच्या रेल्वेस्टेशनसह जेलरोड परिसराला छावणीचे स्वरुप आले होते. अबू सालेमला कडेकोट बंदोबस्तात एक बड्या शहरात हलवण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हे शहर कोणते आहे? याचा मात्र खुलासा अद्याप करण्यात आला नाही. अबू सालेमला त्याची हत्या केली जाईल अशी भीती होती, त्यामुळं त्याला दुसऱ्या शहरात हलवण्यात आले आहे. ज्या रेल्वेतून अबू सालेमला नेण्यात आले होते. त्या रेल्वेच्या विशेष बोगीची श्वान पथकाकडून तपासणीदेखील करण्यात आली होती. मात्र, अबू सालेमला आता कोणत्या कारागृहात ठेवणार? याबाबत अजून स्पष्टता नाही.