धक्का लागल्याच्या वादातून थेट तरुणाचे अपहरण; मारहाण करून पैसे उकळले, पुणे गुन्हे शाखेने केले जेरबंद
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – भाजी खरेदी करण्यासाठी पायी जाताना धक्का लागल्याने झालेल्या वादातून थेट तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याचा धक्कदायक प्रकार घडला आहे. पुण्यातील वाघोली रोडवर ही घटना घडली. एवढच नाही तर अपहरण केल्यानंतर जबरदस्तीने गुगल-पे वरुन पैसे ही उकळले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणी पाच तरुणांना अटक केली आहे. लुकमान हासमत हश्मी यांनी याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुमार पवार, नितीन पवार, ओम गव्हाणे, मनोज निंबाळकर आणि विकास कांबळे यांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली रोडवर फिर्यादींचे भाऊ भाजी खरेदी करण्यासाठी पायी गेले होते. त्यावेळी एका १७ वर्षाच्या मुलाने फिर्यादीच्या खांद्याला धक्का दिला, म्हणून फिर्यादीने त्यास “पाहून चालत जा” असे म्हणाले. या गोष्टीचा त्याला राग आला आणि त्याच्या साथीदाराने त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. मारहणीवरच न थांबता त्या तरुणाने त्याच्या इतर साथीदारांना बोलवून घेतले.
पिडीतांना चक्क गाडीमध्ये बसवून जबरदस्तीने एका अज्ञात स्थळी नेले आणि तिथे त्यांच्याकडून जबरदस्तीने गुगल पेवरुन १८ हजार रुपये घेतले. या सगळ्या प्रकरणानंतर पिडीत यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सापळा रचून या तरुणांना गुरुवारी ताब्यात घेऊन अटक केली.