नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा; हायकोर्ट निकाल देईपर्यंत नवाब मलिक यांचा वैद्यकीय जामीन कायम

Spread the love

नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा; हायकोर्ट निकाल देईपर्यंत नवाब मलिक यांचा वैद्यकीय जामीन कायम

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – माजी अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने नवाब मलिक यांना कायमस्वरूपी वैद्यकीय जामीन दिला आहे. हायकोर्ट निकाल देईपर्यंत नवाब मलिक यांचा वैद्यकीय जामीन कायम राहणार आहे. म्हणजे नवाब मलिक आता जेल बाहेरच राहणार आहेत. आज ईडीच्या वकिलांनीही याबाबत आम्हाला कोणतीही शंका नसल्याचे सुप्रीम कोर्टात स्पष्ट केले. न्यायाधीश बेला त्रिवेदी यांच्यासमोर आज सुप्रीम कोर्टात झाली सुनावणी. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर नवाब मलिक हे नाव चर्चेत आलं. त्यांनी त्यावेळेच एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले होते. नवाब मलिक यांची मोठी मुलगी निलोफर यांचे पती समीर खान यांना सुद्धा एनसीबीकडून अटक झाली होती. नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर ते तुरुंगात होते. नवाब मलिक सध्या जामिनावर बाहेर आहेत. ते सध्या मुंबई चेंबूर येथील अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. आधी ते कुर्ल्यातून निवडणूक लढवायचे. नवाब मलिक यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शरद पवार-अजित पवार राजकीय संघर्षात अजित पवार यांना साथ दिली. पण महायुतीमध्ये त्यांना सामील करुन घेण्यास भाजपाचा आक्षेप आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक नवाब मलिक हे अपक्ष लढवण्याची शक्यता आहे किंवा ते शरद पवार गटात प्रवेश करु शकतात. हा अजित पवार गटासाठी धक्का असेल.

देवेंद्र फडणवीस यांनी याआधी अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिक यांना महायुतीत सामील केलं जाऊ नये, अशी विनंती केली होती. “नवाब मलिक यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना पाठवलेल्या पत्रात म्हणाले होते. जेलमधून बाहेर पडल्यानंतर नवाब मलिक पहिल्यांदा विधानसभेत गेले तेव्हा ते अजित पवार गटाच्या कार्यालयात गेले होते. यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon