जिम ट्रेनरने वर्क आऊट करणाऱ्या तरुणाच्या डोक्यात घातला सोटा; नवघर पोलिसांकडून ट्रेनरला अटक
योगेश पांडे /वार्ताहर
मुंबई – मुंबईतील मुलुंड भागातील एका जिममधील धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. मुलुंडमध्ये एका तरुणाला जिम ट्रेनरने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. याप्रकरणी नवघर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २० वर्षीय तरुण युगेश शिंदे नेहमीप्रमाणे या जिममध्ये वर्कआऊट करत होता. वर्कआऊट करताना त्याला दोघेजण मदतही करत होते. त्यांच्यामध्ये गप्पा चालल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे. हे सर्व सुरू असताना जिमचा ट्रेनर डायरव नाकेल हा लांबून पाहत होता. त्याने अचानक हातातील व्यायाम करण्याचा सोटा घेतला आणि युगेश शिंदे याच्या दिशेने गेला. आणि युगेशच्या डोक्यात लाकडी सोटा घातला. जोरात प्रहार झाल्याने युगेश डोके धरुन जागेवरच बसला. तर इतर लोक ट्रेनर शांत करत घेऊन गेले. युगेश हा युवक जिम ट्रेनरकडे रागाने पाहत होता, यामुळे ट्रेनरने राग येऊन युगेश वर हल्ला केल्याची माहिती आहे. या प्रकरणी नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी ट्रेनरला अटक केली आहे.