भिवंडी पालिकेचा भोंगळ कारभार, नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी; जनजीवन विस्कळीत

Spread the love

भिवंडी पालिकेचा भोंगळ कारभार, नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी; जनजीवन विस्कळीत

योगेश पांडे / वार्ताहर 

भिवंडी – ठाणे जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही म्हणजेच रविवारी पाऊस सुरूच असून जिल्ह्यातील इतर शहरांच्या तुलनेत भिवंडीत मात्र जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे कामावारी नदी काठच्या वस्त्यांच्या परिसरात गुडघाभर पाणी साचुन ते आसपासच्या घरांमध्ये शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. छत्रपती शिवाजी महाराज चौकासह इतर सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तसेच बाजारपेठेतही पावसाच्या पाण्याचे तळे साचले असून हे पाणी दुकानामध्ये शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. शहरातील रस्त्यांवर साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. ठाणे जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारही दिवसभर पाऊस सुरूच होता. रविवारीही जिल्ह्यातील शहरांमध्ये पाऊस सुरूच होता. परंतु भिवंडीत पावसाचा जोर जास्त असल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले. कामवारी नदी काठच्या वस्त्यांच्या परिसरात गुडघाभर पाणी साचून ते आसपासच्या घरांमध्ये शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. नदीनाका, म्हाडा कॉलनी या भागात पावसाच्या पाण्याचे तळे साचले तर या पाण्यात रस्त्यावर उभी असलेली बस अर्धी बुडाली.

तीनबत्ती, खडक रोड, शिवाजीनगर भाजी मार्केट, कमला हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज चौकासह इतर सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. मुख्य बाजारपेठेतही गुडघाभर पाणी साचले. हे पाणी दुकानात शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. शहरातील रस्त्यांवर साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसून आले तसेच साचलेल्या पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागत असल्याने त्यांचे हाल झाले. भिवंडीच्या कामवारी नदीजवळील नदीनाका झोपडपट्टी भागातील सुलतानिया गलीमध्ये लोकांच्या घरात गुडघाभर पाणी शिरले. नागरिकांचे हाल झाले. परंतु या भागात पालिका प्रशासन विचारपूस करण्यासाठी फिरकले नसल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत होता. नाले सफाई योग्यप्रकारे होत नसल्यामुळेच दरवर्षी भिवंडीत पाणी साचून घरांमध्ये पाणी शिरते. यंदाही हीच परिस्थिती असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. पावसाळ्याच्या काळात उदभवणाऱ्या आपत्तीचा तात्काळ सामना करून नागरिकांना तात्काळ मदत करता यावी यासाठी ठाणे जिल्ह्यातील पालिकांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. भिवंडी पालिकेतही असाच कक्ष स्थापन करण्यात आला असून या कक्षाशी संपर्क साधण्यासाठी दोन क्रमांक देण्यात आले आहेत. परंतु या कक्षात फोन केल्यावर कॉल उचलला जात नाही. या क्रमांकावर कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने भिवंडी पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon