१३ जुलैला पंतप्रधानांच्या हस्ते होणार मुंबईतील पूर्व – पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या दुहेरी बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – मुंबईतील विविध प्रकल्पाची मुहूर्तमेढ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या शनिवार १३ जुलै रोजी रोवली जाणार आहे. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाच्या तीसऱ्या टप्पा अंतर्गत येणाऱ्या बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या दुहेरी बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन देखील या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांना रस्ते मार्गाने जोडण्याच्या उद्देशाने महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प ( जीएमएलआर ) मुंबई महानगर पालिकेने हाती घेतला आहे. सुमारे १२.२० किमी लांबीच्या या मार्गाने पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यान प्रवासाची वेळ ७५ मिनिटांवरुन २५ मिनिटांवर येणार आहे. या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्पा बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार आहे. यासाठी प्रत्येकी ४.७ किमी अंतराच्या जुळा बोगद्यांची निर्मिती केली जाणार आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील दुहेरी बोगद्यामुळे ठाणे ते बोरीवरी हे अंतर १२ किमीने कमी होणार आहे. सध्या ठाणे ते बोरीवली व्हाया घोडबंदर मार्गाने जाण्यासाठी २३ किमीचा मार्ग असून पिक अवरमध्ये त्याने प्रवासासाठी तास ते दीड तास इतका वेळ लागतो. परंतू प्रस्तावित दुहेरी बोगद्याने ( एका बोगद्यात तीन पदरी रस्ता) वाहनांना अर्ध्यातासांत ठाण्याहून बोरीवली गाठता येईल अशी योजना आहे. याच दुहेरी बोगदा प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी १३ जुलै रोजी होणार आहे. गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे सायंकाळी ५ वाजता सोहळ्याचे आयोजन होणार आहे.