धक्कादायक ! ‘समोर बघून गाडी चालव’ सांगितल्याने तरुणाचा पाठलाग करुन दगडाने मारहाण
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – समोर बघून गाडी चालव असे सांगितल्याचा राग आल्याने तरुणाचा पाठलाग केला. तरुण राहत असलेल्या सोसायटीत येऊन त्याला दगडाने आणि काठीने बेदम मारहाण करुन जखमी केले. ही घटना वडगाव शेरी येथील ब्रह्मा सनसिटी सोसायटीत घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत रजद विनादकुमार पाड (वय-२७ रा. ब्रह्मा सनसिटी सोसायटी, वडगाव शेर, पुणे) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन आयुष कदम (वय-१९), आयुष शिंदे (वय-१९ रा. वडगावशेरी गावठाण, पुणे) इतर दोन साथीदारांवर भारतीय न्याय संहिता कलम ११७ (२), ११८(१)(३) (४), ११५(२), ३५२, ३५१(२) (३), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रजत पांडे हे त्यांच्या दुचाकीवरुन घरी जात होते. त्यावेळी आरोपी समोरून दुचाकीवरुन भरधाव वेगात आले. त्यावेळी रजत यांनी समोर बघुन गाडी चालवा असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी थोडे पुढे जाऊन त्यांची गाडी थांबवली. रजत याच्याजवळ येऊन तुझीच चुक आहे असे म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर रजत तिथून निघाल्यानंतर आरोपींनी त्याचा पाठलाग करुन सोसायटीत आले. सोसायटीच्या आवारात आरोपींनी रजत यांना दगड व काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देऊन तिथून पसार झाले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.