ठाण्यात एमएमआरडीए प्राधिकरण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रस्त्यांवर ५०० हून अधिक खड्डे

Spread the love

ठाण्यात एमएमआरडीए प्राधिकरण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रस्त्यांवर ५०० हून अधिक खड्डे

योगेश पांडे / वार्ताहर 

ठाणे – घोडबंदरचा रस्ता आणि खड्डे हे नेहमीचे समीकराण बनले आहे. अनेक अपघात होत असतानाही आणि याच जिल्ह्याचे मुख्यमंत्री असतानाही अद्यापही घोडबंदर रस्त्याचा दर्जा सुधारण्यात प्रशासन सपशेल अयशस्वी ठरल्याचे घोडबंदर रस्त्यावरून स्पष्ट होत आहे. ठाण्यातील घोडबंदर रस्ता हा राज्य महामार्ग असून हा सार्वजनिक बांधकाम विभाग एमएमआरडीए, मेट्रो प्रकल्प तसेच ठाणे महापालिकेच्या माध्यमातून देखभाल केली जाते. यामध्ये सेवा रस्ता ठाणे महापालिकेच्या अखत्यारित येतो. केवळ प्रशासनाच्या निष्काळजीमुळे दरवर्षी घोडबंदर रस्त्यावरील दुरवस्थेमुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून, घोडबंदरवर पडलेल्या मोठ-मोठ्या खड्ड्यामुळेच पावसाळ्यात नाहक बळी जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढण्यास प्रशासन कारणीभूत असल्याचा आरोप मनसेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी निवेदनाद्वारे केला आहे. घोडबंदर रस्ता हा राज्य महामार्ग असल्यामुळे या रस्त्यावर नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची वर्दळ असते. याचबरोबर पनवेल जेएनपीटी, नाशिक अहमदाबाद, राजस्थान येथे जाणाऱ्या अवजड वाहने देखील येथून मोठ्या प्रमाणावर याच महामार्गावरून ये जा करत असल्याने येथील रस्ता सुस्थितीत ठेवण्याची जबादारी सर्व प्राधिकारणाची असून देखील प्रशासनाच्या निष्काळजीमुळे ठाणेकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या मार्गावरील अपघाताचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने या संबंधित क्षेत्राची कामे महापालिका करेल, असे सूचित करण्यात आले आहे. मात्र, तरीही ही कामे केली जात नसल्याचे समोर येत असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घ्यावी, अशी मागणी मनसे ठाणे शहर अध्यक्ष जनहित व विधी विभागाचे स्वप्नील महिंद्रकर यांनी केली आहे

सध्याच्या घडीला या रस्त्यावर जागोजागी एमएमआरडीए प्राधिकरणाच्या वतीने खोदण्यात आले आहे. पावसाळ्यात मुख्य राज्य महामार्ग वाहतूक कोंडीमध्ये अडकला असून सेवा रस्त्याच्या माध्यमातून वाहतूक सुरळीत करण्याचे काम पोलिसांमार्फत केले जात होते, पण त्याला सुद्धा या पावसाळ्यात एमएमआरडीएच्या नियोजनशून्य कारभारामुळे ब्रेक लागला आहे. याप्रश्नी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता व्ही.जी.सुर्वे यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. घोडबंदरवरील गायमुखपर्यंत अनेक पूल आहेत. मात्र, या पुलांवरही अनेक खड्डे पडले असून रस्त्याची चाळ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे या परिसरातील दोन ते तीन तास वाहतूक कोंडीला ठाणेकरांना सामोरे जावे लागत आहे. तर या घोडबंदर रस्त्यावर ५०० हून अधिक खड्डे असून याचा मनस्ताप दरवर्षी नागरिकांना सहन करावा लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon