अवैध दारू विक्रीसाठी चक्क देवघराचा वापर! वर्ध्यात दारू विक्रीचा अनोखा व धक्कादायक प्रकार; दारू विक्रेत्यासह २४ हजारांचा मुद्देमाल जप्त
योगेश पांडे / वार्ताहर
वर्धा – दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारू विक्रीचा एक अनोखा आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यात अवैध दारू विक्रीसाठी चक्क देवघराचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे छुप्या मार्गाने दारू विक्रीसाठी आता देवाचाही आधार घेतला जात असल्याचे उदाहरणच वर्ध्यातून समोर आले आहे. यापूर्वीही दारू विकण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत दारू विक्रेत्यांकडून वर्ध्यात दारू विकली जात असल्याचे अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, दारू विक्रेत्यांनी आता देवालाही सोडलं नसल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. वर्ध्याच्या गणेश नगर येथील एका दारू विक्रेत्याने चक्क देवघरातच दारूची साठवणूक करून तेथून दारू विक्री चालविल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या प्रकाराची माहिती पोलिसांनी मिळताच त्यांनी अचानक धाड टाकत घराची झडती घेतली. सुरुवातीला पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही, पण ज्यावेळी घराच्या आत असलेल्या देवघरात पाहणी केली त्यावेळी देवघरात देवाच्या आसनाच्याखाली असलेल्या ड्रॉवरमध्ये दरूसाठा सापडलाय. याशिवाय काही बॉटल फ्रीजमध्ये देखील सापडल्या आहेत. पोलिसांनी हा दारूसाठा जप्त केला असून, दारू विक्रेत्यालाही बेड्या ठोकल्या आहेत.
आशिष उर्फ पिंटू कन्हैयालाल जयस्वाल असे या दारू विक्रेत्याचे नाव आहे. लाकडाच्या मोठ्या देवघरात खालच्या बाजूला असलेल्या बॉक्समध्ये विदेशी दारूच्या बॉटल्स दडवून ठेवण्याची ही शक्कल पोलिसांना देखील आश्चर्यचकित करणारी ठरलीय. तसेच घरातील फ्रिजमध्ये गावठी मोहा दारू आढळून आलीय. पोलिसांनी दारूसह फ्रिज, असा २४ हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय. सोबतच आशिष जयस्वाल यालाही अटक केलीय. देवघरात दारू सापडण्याच्या या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. तसेच शहर पोलीसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून पोलीस निरीक्षक पराग पोटे यांना विचारले असता, ते स्वतः गणेश नगर येथे पोहचले होते. सर्वत्र दारू विक्रेत्याच्या घरी शोध घेतला आणि फ्रीजमध्ये गावठी दारू आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली. पोलीस दारू विक्रेत्याच्या घरी आणि झाडाझडती करीत असताना देवघरात इतर साहित्य ठेवण्यात आलेल्या कप्प्यात ही दारू आढळून आली.