अनैतिक संबंधातून पत्नीने काढला पतीचा काटा, पत्नी-प्रियकरासह कुटुंबीयांनी रचला कट; नांदगाव पोलिसांना उकल करण्यात यश

Spread the love

अनैतिक संबंधातून पत्नीने काढला पतीचा काटा, पत्नी-प्रियकरासह कुटुंबीयांनी रचला कट; नांदगाव पोलिसांना उकल करण्यात यश

योगेश पांडे / वार्ताहर 

नाशिक – घरगुती वाद व अनैतिक संबंधातून खुनाची धक्कादायक घटना नांदगाव तालुक्यात घडली आहे. पत्नी, प्रियकर, बहीण व मुलगा यांनी संगनमताने पतीचा काटा काढला असून २४ तासांच्या आत नांदगाव पोलिसांना घटनेची उकल करण्यात यश आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई मनपाचे कर्मचारी दीपक गोण्या सोनवणे (५४) यांची घरगुती वाद व अनैतिक संबंधातून पत्नी, प्रियकर, बहीण व मुलगा यांनी संगनमताने डोक्यात दगड घालून व लाकडी दांडक्याने मारहाण करून हत्या करण्यात आल्याची घटना नाशिकच्या नांदगाव येथील जातेगाव येथे घडली. संशयित पत्नी पल्लवी दीपक सोनवणे, मेहुणी व मेहुणीचा मुलगा, नितीन चंद्रकांत मोरे यांनी संदीप (रमेश) महादू लोखंडे, साईनाथ बाबुलाल सोनवणे, लखन बाबुलाल सोनवणे यांच्याशी संगनमत करून खुनाचा कट रचला. त्यानुसार दीपक यांना जातेगाव शिवारातील महादेव मंदिराजवळ बोलावून घेण्यात आले. या ठिकाणी लाकडी दांडक्याने व डोक्यात दगड मारून ठार केले. त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला ढकलून देत प्रेत झाडावर टाकून असा अपघाताचा बनाव करत सर्वांनी पोबारा केला होता.

घटनास्थळी अपघाताचे चित्र दिसत असले तरी त्याबाबत संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. आधारकार्डवरून मयताची ओळख पटल्यानंतर कुटुंबीयांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावे आणि तांत्रिक विश्लेषणानंतर संशयितांची कसून चौकशी करण्यात आली. त्यातून खुनाचा उलगडा झाला. सोनवणे व मोरे परिवारातील सहा जणांनी ही हत्या केल्याचे आणि पत्नीदेखील सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. तर २४ तासांच्या आत चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon