डोंबिवली स्फोटात बेपत्ता झालेल्या पाच कामगारांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश
योगेश पांडे / वार्ताहर
डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसीत झालेल्या स्फोटाला गुरुवारी १५ दिवस झाले आहेत. या दुर्घटनेने मुंबईसह महाराष्ट्र हादरून गेला आहे. अमुदान कंपनीतील या भीषण स्फोटात आतापर्यंत १७ लोकांचा मृत्यू झाला असून अजूनही काही जण बेपत्ता असल्याची महिती आहे. मात्र, स्फोट झालेल्या घटनास्थळी जवळपास २५ ते ३० मानवी अवशेष मिळाले होते, त्याची डीएनए तपासणीची प्रक्रियाही करण्यात आली होती. यात या बेपत्ता झालेल्यांपैकी पाच कामगारांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, अद्यापही काही लोक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. या बेपत्ता असलेल्या व्यक्तींचे नातेवाईक स्फोट झाल्याच्या ठिकाणी व शासन दरबारी मोठ्या आशेने हेलपाटे मारत आहेत. मात्र, या नातेवाईंकांच्या पदरी निराशाच पडत आहे. त्यातच, या स्फोटानंतर बेपत्ता झालेल्या एका मुलाची वाट त्यांची वयोवृद्ध आई अजूनही पाहत आहे. गेल्या १५ दिवसानंतरही माझा मुलगा परत येईल, अशी अशा या वयोवृद्ध आईला आहे. ऐन उमेदीच्या वयात मुलांचे असे बेपत्ता होणं आणि त्यांची कुठलीही माहिती मिळत नसल्याने बैचेन असलेली आई मुलाच्या आठवणीने आणि परतीच्या अपेक्षेने व्याकुळ झाली आहे. या वेदना मांडताना त्यांचे डोळे पाणावल्याचं दिसून आलंय.
डोंबिवली अमुदान कंपनीच्या स्फोटाला १५ दिवस झाले असून या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला. तर अजूनही ९ कामगार बेपत्ता आहेत. या बेपत्ता झालेल्यांपैकी पाच कामगारांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. पाच जणांचा डी एन ए मॅच झाला असून एकाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याची माहिती क्राईम पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली आहे. अशातच डोंबिवली अमुदान कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेले मनोज जोंधळे हे २३ मे रोजी सकाळी आपल्या आईला सांगून कंपनीत कमाला गेले आणि ते पुन्हा परतलेच नाहीत. मनोज यांची वयोवृद्ध आई मुलाची वाट बघतेय. माझ्यासमोर माझ्या मनोजचे काही बरेवाईट झालेच नाही, तर विश्वास कसा ठेवणार. मुलगा पुन्हा येईल अशी आशा या वयोवृद्ध आईला आहे. आल्या मुलावरील प्रेमाची एका आईची वेडी माया तिला स्वस्थ बसू देत नाहीये. परिणामी अजूनही तीच्या नजारा आपल्या मुलाच्या परतीच्या वाटेकडे लागल्या आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून तीस मानवी अवशेष हस्तगत केले होते. या तीस मानवी अवशेषांसह ६० नमुने डीएनए तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी नऊ जण बेपत्ता झाले होते, यापैकी पाच जणांची ओळख पटली आहे. मनीष दास, मनोज चव्हाण,रवी राजभर,भारत जैस्वार ,विशाल पौडवाल या पाच बेपत्ता झालेल्या कामगारांची ओळख पटली असून विशाल पौडवाल यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या ३० मानवी अवशेषांपैकी एक अवशेष ज्याला वरचा आणि खालचा भाग नसलेल्या मानवी अवशेषाचा डीएनए रिपोर्ट समोर आला आहे. शरीराचा वरचा आणि खालचा भाग नसलेला मृतदेह हा विशाल पौडवाल यांचा असल्याचे समोर आले आहे. विशाल पौडवाल अमुदान कंपनीच्या बाजूला असकेल्या कॉसमॉस इंजिनिअरिंग कंपनीत कामाला होते.विशाल यांचा आठ वर्षाच्या मुलाचा डीएनए मॅच झाल्यामुळे विशाल यांच्या पत्नी प्रतीक्षा यांच्याकडे मृतदेह देण्यात आला आहे. पोलिसांनी ३० मानवी अवशेष हस्तगत केले होते. त्यातील एकाचा रिपोर्ट समोर आला आहे. तर काही रिपोर्ट पुढच्या दोन दिवसात मिळतील, अशी माहिती तापस अधिकाऱ्यांनी दिली आहे.