सायन रुग्णालयात महिलेला चिरडणाऱ्या डॉक्टर ढेरे यांची नायर रुग्णालयात बदली ; निलंबन न केल्यानं नातेवाईक संतप्त
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – सायन रुग्णालयात महिलेला गाडीने चिरडणाऱ्या ड़ॉक्टर राजेश ढेरे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई न करता केवळ बदली केल्यानं मृत्यू झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. सायन रुग्णालय परिसरात ड़ॉक्टर राजेश ढेरे यांच्या कारने महिलेला चिरडलं होतं. यात महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, आता त्यांची बदली सायन रुग्णालयातून नायर रुग्णालयात करण्यात आली आहे. डॉक्टर राजेश ढेरे यांचे निलंबन करण्याऐवजी केवळ बदली केल्यानं नातेवाईकांनी संतापाची भावना व्यक्त केली. सायन रुग्णालयाच्या परिसरात ६० वर्षीय रूबेला शेख या महिलेला राजेश ढेरे यांच्या गाडीने चिरडले. यात महिलेचा मृत्यू झाला होता. या अपघात प्रकरणी राजेश ढेरे यांची जामिनावर सुटकाही झाली.
दरम्यान, ढेरे हे सायन रुग्णालयातच कार्यरत असल्याने रुग्णालयात आल्यानंतर त्यांच्याकडून अपघातासंदर्भात पुरावे नष्ट केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात येण्यास बंदी घालण्याची मागणी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली होती. राजेश ढेरे यांना कोणतीच जबाबदारी देऊ नये अन्यथा पुरावे नष्ट केले जातील अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. शुक्रवारी सायन रुग्णालय परिसरात भरधाव कारने रुबेदा शेख यांना कारने धडक दिली. त्या रुग्णालयात उपचारासाठी आल्या होत्या. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आल्यानंतर डॉक्टरला अटक करण्यात आली होती. राजेश ढेरे हे सायन रुग्णालयात फॉरेन्सिक मेडिसिन आणि टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख आहेत.