कल्याणमध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मिलिंद कांबळेना वंचितच्याच कार्यकर्त्याकडून मारहाण
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होत आहे. मुंबईतील ६ जागांसह ठाणे, कल्याण, भिवंडी , पालघर आणि इतर ३ अशा एकूण १३ लोकसभा मतदारसंघात पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र मैदानात असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. मात्र,येथील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा मोठा गेम झाल्याचं उघडकीस आलं आहे. केवळ नावात साधर्म्य असल्याने दुसऱ्याच उमेदवारांने एबी फॉर्म चोरुन उमेदवारी अर्ज दाखल केला होता. कल्याणमधून वंचित बहुजन आघाडीने मिलिंद कांबळे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांच्याकडील एबी फॉर्म चोरून दुसऱ्याच मिलिंद कांबळे नावाच्या व्यक्तीन कल्याणमधून वंचितचा उमेदवारी अर्ज दाखल केला. वंचितमधील हा वाद आता चव्हाट्यावर आला असून अगोदर उमेदवारी गेली, आता वंचितच्या कार्यकर्त्यांकडून मिलिंद कांबळे यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. कल्याणमधील वंचितi बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यास वंचितच्याच कार्यकर्त्याकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली.
पक्षाशी दिशाभूल केल्याच्या गैरसमजुतीतून वंचितच्या कार्यकर्त्याने मिलिंद कांबळे यांना मारहाण केली. मात्र, ज्यांना मारहाण करायचं होते, ते राहिले बाजुला व ज्यांच्यावर अगोदरच अन्याय झाला, त्याच मिलिंद कांबळे यांना वंचितच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. मात्र, गैरसमजुतीतून ही मारहाण झाल्याचं स्पष्टीकरण आता देण्यात आलं आहे.विशेष म्हणजे मिलिंद कांबळे यांना मारहाण केल्याच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हायरल व्हिडिओमुळे वंचितच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला आहे. मात्र, आता स्वत: मिलिंद कांबळे यांनी या मारहाणीवर स्पष्टीकरण दिलं आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात मिलिंद कांबळे यांना वंचित बहुजन आघाडीकडून एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र नावात साम्य असल्याचा फायदा घेत दुसऱ्याच मिलिंद कांबळे यांनी फॉर्म चोरून भरला. याप्रकरणामुळे वंचितमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती, त्यानंतर फॉर्म भरणाऱ्या मिलिंद कांबळेविरोधात पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यातच, संबधित व्यक्तीला मारहाण करण्यासाठी गेलेल्या वंचितच्या कार्यकर्त्यांनी चक्क पदाधिकारी असलेल्या व उमेदवारीपासून मुकलेल्या मिलिंद कांबळे यांनाच मारहाण केली. मात्र, ही मारहाण गैरसमजातून झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे विरुद्ध महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर यांच्यात थेट लढत आहे. तर, वंचित बहुजन आघाडीनेही येथून उमेदवार दिला आहे.