बाकड्यांच्या’ माध्यमातून खासदार श्रीकांत शिंदे यांचा प्रचार सुरुच

Spread the love

बाकड्यांच्या’ माध्यमातून खासदार श्रीकांत शिंदे यांचा प्रचार सुरुच

डोंबिवली रेल्वे स्थानकात पाचही फलाटांवर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे नामफलक असलेले १० ते १५ बाकडे लावल्याने प्रवाशी संतापले

योगेश पांडे / वार्ताहर 

डोंबिवली – डोंबिवली रेल्वे स्थानकातील पाचही फलाटांवर प्रवाशांना बसण्यासाठी बाकड्यांची (बेंच) मुबलक सुविधा आहे. ही सुविधा असताना गेल्या काही दिवसांपासून डोंबिवली रेल्वे स्थानकातील पाचही फलाटांवर स्टीलचे बाकडे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सौजन्याने असे नामफलक असलेले १० ते १५ बाकडे डोंबिवली रेल्वे स्थानकात दिसू लागले आहेत. उपलब्ध बाकडे पुरेसे असताना पुन्हा या वाढीव बाकड्यांची रेल्वे स्थानकात गरजच काय असे प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केले जात आहेत.

डोंबिवली रेल्वे स्थानकात पाचही फलाटांवर स्टीलचे, कडाप्पा, खांबाच्या आधाराचे बाकडे आहेत. गेल्या काही वर्षापासून पाठोपाठ लोकल धावत असतात. त्यामुळे प्रवासी बाकड्यांवर काही क्षण बसतो. सकाळ, संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत हे बाकडे अनेक वेळा प्रवाशांंना अडचणीचे ठरतात. अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसापूर्वी डोंबिवली रेल्वे स्थानकातील पाचही फलाटांवर प्रत्येकी तीन ते चार अशा पध्दतीने शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नामफलक असलेले बाकडे डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटांवर दिसू लागल्याने प्रवाशांच्या भुवया उंचावल्या आहेत. अगोदरच आहे त्या बाकड्यांचा वापर होत नसताना हे नवीन बाकडे फलाटांवर बसवून प्रवाशांच्या येण्याच्या जाण्याच्या मार्गात अडथळे कशाला आणि कोणी निर्माण केले आहेत, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. खासदार शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आहेत.

निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून लोकसभा निवडणुकीपूर्वी हे बाकडे रेल्वे स्थानकात आणून ठेवण्यात आले आहेत का, असेही प्रश्न प्रवासी उपस्थित करत आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर कल्याण, डोंबिवली शहर परिसरातील राजकीय नेत्यांचे फलक, केंद्र, राज्य सरकारच्या लोकाभिमुख जाहिराती पालिका, महूसल प्रशासनाने विविध प्रकारच्या युक्त्या करून झाकून टाकले आहेत. डोंबिवली रेल्वे स्थानकातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिजिटल इंडियाची जाहिरात रेल्वे प्रशासनाकडून झाकून टाकण्यात आली आहे. मग रेल्वे स्थानकातील खासदार शिंदे यांचे नाव असलेल्या बाकड्यांवर अद्याप झाकण्याची कारवाई का करण्यात आली नाही. स्थानिक निवडणूक अधिकारी, रेल्वे प्रशासन याबाबत अनभिज्ञ कसे, असे प्रश्न प्रवासी करत आहेत.

खासदार निधीतून शहरातील विविध प्रभागांमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी नगरसेवक, लोकांच्या मागणीप्रमाणे बाकडे आणि इतर सुविधा दिल्या जातात. पण रेल्वे स्थानकात खासदारांच्या प्रयत्नाने बाकडे देण्याचा प्रकार पाहून प्रवासी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

डॉ. स्वप्निल निला,मुख्य जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वेयांनी सांगितले आहे कि रेल्वेच्या यापूर्वीच्या उपलब्ध बाकड्यांच्या मध्ये खासदार सौजन्याचे बाकडे घुसवून बसविण्यात आले आहेत. हे बाकडे फलाटावर खिळे लावून घट्ट बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे अनेक वेळा गर्दीचा लोट आला की हे बाकडे हलतात. काही वेळा ते सरकतात, अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. अंध व्यक्तिंना हे बाकडे अडथळे ठरत आहेत. डोंबिवली रेल्वे स्थानकातील लोकप्रतिनिधींच्या नावे असलेल्या बाकड्यांवर नाव असेल आणि ते निवडणूक आचारसंहितेचा भाग म्हणून झाकले गेले नसेल तर ते तातडीने झाकण्याची कार्यवाही करण्याची सूचना केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon