छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडमध्ये इंटरनेट बंद:आंदोलकांनी एसटी पेटवल्याने बससेवाही रद्द, तर अंबडमध्ये संचारबंदी लागू
जालना – मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या पार्श्वभमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून गैर प्रकार टाळण्यासाठी तीन जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. काल त्यांनी मुंबईला देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यासमोर उपोषण करणार आहे असे जाहीर केले होते, दरम्यान, ते पुन्हा अंतरवली सराटी येथे माघारी फिरले असून आज ते सायंकाळी ५ वाजता त्यांची दिशा स्पष्ट करणार आहे. दरम्यान, आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर जालना, संभाजीनगर, बीड येथे चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या सोबतच येथील इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे. तर जालना येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे आंदोलन करत आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत जरांगे फडणवीस यांच्या मुंबईच्या सागर बंगल्यावर निघाले होते. यावेळ जरांगे प्रचंड आक्रमक झाले होते. त्यानंतर आता मराठा समाज देखील आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून पाऊलं उचलले जात आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा १० तास बंद करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत, दरम्यान भांबेरी गावामधून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी तयारी करत असलेल्या मनोज जरांगे-पाटलांच्या शैलेंद्र पवार, बाळासाहेब इंगळे या २ सहकाऱ्यांना पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतलं. या घटनेचे पडसाद जिल्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे राज्य परिवहन महामंडळाची बस पेटवून दिली. या जाळपोळीनंतर पुढील सूचना मिळेपर्यंत एसटीची सेवा जालना जिल्ह्यामध्ये स्थगित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.