पार्सल कस्टममध्ये अडकले आहे सांगत वृद्धाची ११ लाखांची फसवणूक
ठाणे – मुंबई कस्टममध्ये तुमचे बेकायदेशीर पार्सल अडकले आहे, म्हणत वृद्धाची तब्बल ११ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी वृद्धाने चितळसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मोबाईलधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने फोन कफून तुमचे तैवान देशात पार्सल पाठवित असून ते मुंबई कस्टममध्ये थांबविण्यात आले आहे व त्यात बेकायदेशीर वस्तू असल्याचे खोटे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांचा कॉल आरोपीने मुंबई गुन्हे शाखा, अंधेरी पूर्व येथे ट्रान्सफर करण्याचा बनाव करून त्यांच्या बँकखात्यावर फिर्यादी यांना एकूण ११ लाख रुपये रक्कम ऑनलाईन ट्रान्स्फर करण्यास सांगून त्यांची आर्थिक फसवणूक केली.
सदर फसवणूकीबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात मोबाईलधारक आरोपीविरुद्ध गुन्हा रजि.नं. || २०९/२०२४ माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन २००० चे कलम ६६ (क),, ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास चितळसर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डाके हे करीत आहेत.