डोंबिवलीतील नामचीन गुंडास घातक शस्त्रासह अटक
डोंबिवली – तडीपार असलेला गुंड सागर उर्फ डोळा काशिनाथ दाते यास कोयत्यासह कल्याण गुन्हे शाखा पोलिसांनी जेरबंद केले आहे. याबाबत अधिक माहीती अशी की, कल्याण गुन्हे शाखा घटक-३ चे पोलीस हवालदार दत्ताराम भोसले यांना त्याचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, डोंबिवली पोलीस स्टेशन रेकॉर्ड वरील नामचीन गुंड सागर ऊर्फ डोळा काशिनाथ दाते हा डोंबिवली पूर्व येथील दत्तनगर प्रगती महाविद्यालयाच्या समोर असलेल्या गार्डन परिसरात भला मोठा कोयता घेऊन फिरत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्वरित कल्याण गुन्हे शाखा घटक-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांना कळविताच त्यांनी तात्काळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले, पोलीस उपनिरीक्षक संजय माळी, हवालदार दत्ताराम भोसले यांच्या पथकास दिले.
सदर पथकाने तिथे जाऊन डोंबिवली पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील तडीपार गुंड सागर ऊर्फ डोळा काशिनाथ दाते (२८) रा.दत्तनगर प्रगती महाविद्यालयाजवळ, डोंबिवली पूर्व हा पोलिसांना पाहून पळत असताना पोलिसांनी पाठलाग करून त्याच्याजवळ असलेल्या घातक हत्यारासह जेरबंद केले. सदर तडीपार गुंडास कल्याण डोंबिवली परिमंडळ-३ मधून १८ महिन्यांकरिता हद्दपार करण्यात आले होते. त्याच्यवर घातक शस्त्राने वार करून दहशत माजविणे असे ३ गुन्हे तसेच एनडीपीएस अंतर्गत एक गुन्हा असे ४ गुन्हे डोंबिवली पोलीस स्टेशनच्या अभिलेखावर दाखल असून त्याच्या विरोधात डोंबिवली पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम ४ व २५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे कारवाई करून आरोपीस ताब्यात घेण्यात आले.