
चोरीसाठी सुरक्षा रक्षकाची केली हत्या
मानपाडा पोलिसांनी 8 तासात केली गुन्ह्याची उकल
दिनेश जाधव : डोंबिवली
मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सुरक्षा रक्षकावर प्रहार करून बंद असलेल्या पेपर कंपनीत प्रवेश करून बंद खोलीतील भंगारात असलेले 1 लाख 50 हजारचे लोखंड चोरले होते. या मध्ये सुरक्षा रक्षक ग्यानबहादुर गुरूम याचा मृत्यू झाला होता. या गुन्हा संदर्भात मानपाडा पोलिसांनी केवळ 8 तासात गुन्ह्याची उकल केली आहे.
सूचक नाका येथे राहणारा टोनी थॉमस डिसिल्वा उर्फ शिवा सोमा हिलम (30) या रिक्षाचालक आणि कोळसेवाडी कल्याण पूर्व येथे राहणारा आणि भांगरचा व्यवसाय करणारा फिरोज इस्माईल खान (30) या दोघांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून फरार असलेल्या त्याच्या आणखी दोन साथीदारांचा मानपाडा पोलिस शोध घेत आहेत. काल सकाळी एमआयडीसी परिसरातील विजय पेपर मार्ट या बंद कंपनीत एक सुरक्षा रक्षक मी त्या अवस्थेत पडल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली. त्यानंतर मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली. यावेळी बांधावरून तीन जणांनी कंपनी मध्ये उडी मारून प्रवेश केल्याचे निदर्शनास आले. तर पुन्हा त्या सीसीटीव्हीमध्ये बंद कंपनीतून आणलेले चोरीचे सामान एका रिक्षेतून घेऊन जाताना हे आरोपी दिसल्याने त्या दृष्टीने शोध सुरू केला.
त्यानंतर रीक्षेची तपासणी केली असता त्यावर एबीपी मॅरेज नावाचे पोस्टर चिकटवलेले दिसले. याच पोस्टर वरून आजूबाजूच्या परिसरातील रिक्षांचा शोध घेतला असता तेथून एक रिक्षा बाहेर पडताना दिसली. रिक्षेवरील पोस्टर देखील फाटलेल्या स्थितीमध्ये होते. तसेच रिक्षा चालक देखील पोलिसांना बघून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. यामुळे संशय बळावल्याने त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर नेमका कशा पद्धतीने गुन्हा केला याची कबुली टोनी याने पोलिसांना दिली. कंपनीच्या आवारात प्रवेश केल्यानंतर सुरक्षारक्षकाने आम्हाला बघितले आणि आरडाओरडा करण्यास सुरुवात केल्याने कंपनीच्या परिसरातच पडलेला रॉड उचलून त्याच्या डोक्यात मारल्याचे देखील त्यांनी सांगितले. सध्या त्याच्याबरोबरचे आणखी दोन जण फरार असून शोध सुरू असल्याची माहिती मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी दिली.
पोलिसांनी केले आवाहन
एमआयडीसी परिसरातील जवळपास 87 कारखाने बंद अवस्थेत आहेत. या कारखान्याचा परिसर मोठा असल्याने याठिकाणी ठेवलेला एक सुरक्षारक्षक अपुरा आसुन निदान दोन सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात यावी आणि ही सर्वस्वी जबाबदारी कारखानदारांची असल्याचे आवाहन पोलिसांनी केले असून यापुढे अशा घटना घडल्यास कारखानदारांवर देखील कारवाई करण्यात येईल असे सहाय्यक उपायुक्त सुनील कुऱ्हाडे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.