
डोंबिवलीच्या रेल्वे मैदानावर इसमाची हत्या
दिनेश जाधव : डोंबिवली
पश्चिम डोंबिवलीतील बावनचाळ परिसरातील रेल्वे मैदानात एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अद्याप पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली नसून त्या दिशेन तपास सुरु आहे. मृतदेहाच्या डोक्यावर जोरदार प्रहार केल्याच्या खुणा दिसत असल्याने त्याची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. डोंबिवली विष्णूनगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारच्या सुमरास डोंबिवली पश्चिमेला बावनचाळ परिसरातील रेल्वे मैदानात एका इसमाचा मृतदेह पडल्याची माहिती विष्णूनगर पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन सदर जागेवर इसमाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. साधारणतः ४५ ते ५० वयोगटातील या इसमाच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार केल्याचे त्याचा जागीच मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेहाची ओळख पटली नसली तरी पोलीस मृतदेहाची माहिती काढण्यासाठी चौकशी सूरु केली आहे. बावनचाळीत परिसरात रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन इसमाला मारले असावे. परंतु त्याची हत्या करण्यामागे काय उद्देश असावा ? कोणी हत्या केली असावी ? याचा तपास विष्णूनगर पोलीस करत आहे. दरम्यान बावनचाळीत रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवणे आवश्यक झाले आहे.