
व्याजासकट पैसे देऊनही दमदाटी करणाऱ्या व्याजखोराला अटक
– धमकी देणाऱ्यांमध्ये मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीचाही समावेश
दिनेश जाधव : कल्याण
व्याजावर पैसे देणाऱ्या एका कुटुंबाने 25 टक्के व्याजाने पैसे देऊनही दिवसाला 800 रुपये व्याज उकळून कर्जदाराची फसवणूक करणाऱ्या एका कुटुंबावर कल्याण येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . विशेष म्हणजे कर्जदारांनी पैसे देऊन सुद्धा पैसे भरत नसल्याचे सांगत दमदाटी करणे, धमकी देणे यासारखे प्रकार या कुटुंबाने केले. दरम्यान या कुटुंबामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांच्या पत्नीचा देखील समावेश असल्याचे समोर आले आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी दंड उकळणाऱ्या व्याजखोरला अटक करुन पोलिस मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीसह अन्य दोन जणांचा शोध घेत आहेत.
कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरात राहणारे सुशांत मोहिते हे व्यापारी आहेत. त्यांना व्यावसायासाठी काही पैशाची गरज होती. त्यांनी व्याजावर पैसे देणाऱ्या दर्पण मंडाले यांच्याकडून दीड लाख रुपये व्याजाने घेतले. दर्पणने 25 टक्के व्याजाने हे पैसे दिले. काही महिन्यात सुशांत याने व्याजासकट दर्पणकडे तीन लाख 54 हजार 500 रुपये परत केले. मात्र इतके सगळे करुन देखील दर्पण आणि त्याचे साथीदार व्याजाच्या रक्कमेत काही पैसे बाकी आहे. व्याज देण्यात उशिर झाल्याने दंडात्मक कारवाई म्हणून बाकी असलेले पैसे जोडून आणखीन चार लाख रुपयांची मागणी करत होते. दर्पण यांनी सुशांत कडे पैसे देण्याचा तगादा लावला. सर्व पैसे देऊन देखील आत्ता आणखीन पैसे कुठून आणू असे वारंवार सुशांत याने सांगून सुद्धा दर्पण काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. दोन दिवसापूर्वी पैशाच्या तगाद्यासाठी दर्पण, त्याची आई विजया, बहिण विशाखा रोहन अक्केवार, पत्नी मनिषा हे सुशांत यांच्या घरी गेले. त्याला जाऊन दमदाटी केली. विशाखा ही कल्याणमध्ये विभाग अध्यक्ष रोहन अक्केवार याची पत्नी आहे. या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने आणि पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु झाला. दर्पण याला अटक केली आहे. अन्य तीन आरोपी पसार आहेत.