
घरगुती पार्टीमध्ये सहभागी झालेल्या आरोपीने पोलिसावरच केले वार
– बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
दिनेश जाधव : कल्याण
घरगुती पार्टीमध्ये सहभागी झालेल्या गुन्हेगाराची ओळख
एका पोलीस कर्मचाऱ्याची करून दिल्यानंतर मी याला एका गुन्ह्यासंदर्भात अटक करण्यासाठी गेलो आहे. त्यामुळे मी याला ओळखतो असे पोलिसांनी सांगताक्षणीच आरोपीने पोलिसाच्या अंगावर चाकूने वार केले. दरम्यान भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेल्या महिलेवर देखील आरोपीने वार केले असून वार झालेले पोलीस कर्मचारी सध्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेची बाजारपेठ पोलीस ठाण्यात नोंद केली आहे.
कल्याण पश्चिमेतील साई श्री हरी सोसायटीत राहणारे देवेंद्र शास्त्री यांनी घरात छोटी पार्टी ठेवली होती. या पार्टीमध्ये त्यांनी कल्याण परिसरात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी दीपक देशमुख आणि देवेंद्र यांचा मित्र राजेश काळे यांना आमंत्रित केले होते. दीपक देशमुख घरी आल्यानंतर देवेंद्र यांच्या घरी आधीच पोहचलेल्या राजेश काळे यांची ओळख देवेंद्र यांनी करून दिली. मात्र एका गुन्ह्यासंदर्भात मी यांना अटक करण्यासाठी गेलो आहे असे सांगून त्याने अटक वॉरंट संदर्भात देवेंद्र यांना माहिती देण्यास सुरुवात केली. ही माहिती देताच राजेश काळे यांनी त्यांच्याकडील चाकू काढून दीपक देशमुख यांच्या मानेवर वार केले. भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या देवेंद्र यांच्या पत्नीवर देखील राजेश याने वार केले. दीपक यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. हल्ला करुन पसार झालेल्या राजेश काळेचा बाजारपेठ पोलिस शोध घेत आहे.