
कल्याण डोंबिवली मनपा निवडणूकांचे बिगुल वाजणार
प्रभाग रचना नंतर आता आरक्षण सोडतीचा कार्यक्रमाची सुरुवात
दिनेश जाधव : कल्याण
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्या नंतर राज्य निवडणूक आयोगाने येत्या शुक्रवार २७ मे पासून आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला असल्याने पालिका निवडणूक बिगुल वाजले आहे.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या ४४ प्रभागातून १३३ सदस्य निवडले जाणार आहेत. यामध्ये ४३ प्रभाग ३ सदस्यांचे पॅनल तर एका प्रभागात ४ सदस्यांचे पॅनल असणार आहे. एकूण ४४ पॅनल मधून १३३ प्रभागमधून १३ प्रभाग अनुसूचित जाती, ४ प्रभाग अनुसूचित जमाती साठी असे १७ प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहे. उर्वरित ११६ प्रभाग खुल्या वर्गासाठी असून यातील प्रत्येकी ५८ प्रभाग महिला व पुरुषांसाठी असणार आहे. त्यामुळे अनुसूचित जाती व जमातीच्या १७ व सर्व साधारण महिला प्रवर्गा साठी ५८ असे ७५ प्रभागांची आरक्षण सोडत ३१ मे रोजी काढण्यात येणार आहे, त्यामुळे कोणता प्रभाग महिलांसाठी राखीव असणार किंवा कोणता प्रभाग खुल्या वर्गासाठी असणार याकडे सर्व इच्छूकांचे लक्ष लागले आहे.
१७ राखीव प्रभागच्या सोडतीसाठी राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला असून शुक्रवार २७ मे रोजी आरक्षित प्रभागांच्या सोडतीच्या नोटीसा प्रकाशित करण्यात येणार आहे. मंगळवार ३१ मे रोजी आरक्षित असलेल्या अनुसूचित जाती जमातीच्या महिला व सर्व साधारण वर्गाच्या आरक्षित जागा निश्चित करण्यात येणार आहे. सोडत नंतर १ जून ते ६ जून रोजी प्रभाग निहाय आरक्षण प्रारूप प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
१ जून ते ६ जून याच कालावधीत आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करता येणार आहे. १३ जून रोजी हरकती सूचना वर अंतिम निर्णय घेऊन प्रभाग निहाय अंतिम आरक्षण सोडत बाबत शासनाच्या राजपत्रात जाहीर करण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक बाबत आरक्षण सोडत महत्वाचा टप्पा असून पालिका प्रशासनाची आयोगाने दिले ल्या आदेशानुसार लगबग सुरू झाली असून राजकीय वातावरणात यामुळे रंगणार असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे.