
प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची चैन लुबाडणारा रिक्षाचालक पोलिसांच्या ताब्यात
– विष्णू नगर पोलिसांची करवाई
दिनेश जाधव : डोंबिवली
तबल्याचे प्रशिक्षण घेऊन सायंकाळी घरी परतत असणाऱ्या विद्यार्थ्याचे एका रिक्षा चालकाने अपहरण करून गळ्यातील सोन्याची चैन लुटल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवली पश्चिम येथे घडला आहे. या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालकावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला असता अवघ्या ४८ तासांतच तांत्रिक बाबींसह सीसीटीव्ही फुटेज व अपहरण झालेल्या मुलाने दिलेल्या वर्णनावरून रिक्षाचालकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
डोंबिवली पश्चिम येथील सिध्दार्थ नगर परिसरात राहणाऱ्या सम्राट अनंत मगरे (१९ ) असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की मोहन बाळाराम भोईर (३८) हे डोंबिवली पश्चिम भागातील देवी चौक परिसरात कुटूंबासह राहतात. त्यांना १३ वर्षीय साई नावाचा मुलगा असून तो तबला वादनाच्या प्रशिक्षणासाठी भागशाळा मैदानजवळ एका क्लासमध्ये जातो. १८ मे रोजी तबला वादनाचे प्रशिक्षण आटपून रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घरी जाण्यासाठी तो रिक्षात बसला. त्यानंतर रिक्षाचालकाला देवी चौक येथे घरी जाण्याबाबत सांगताच त्याने रिक्षा घराच्या दिशेने न जाता चुकीच्या दिशेने वळविली. त्यामुळे साईने विचारणा केली असता त्याने त्याच्या मित्राला सोबत घ्यावयाचे असल्याचे सांगीतले. त्यानंतर मात्र निर्जनस्थळ असलेल्या बावनचाळ येथील रेल्वे मैदानात रिक्षा थांबविली व साईच्या गळयातील सोन्याची चैन काढुन घेतली. त्यानंतर रिक्षा घराच्या दिशेने घेवुन जात असताना त्याच्या आईचा मोबाईलवर कॉल आला असता साईने सांगितले कि रिक्षाचालक विनाकारण फिरवत असुन त्याने गळयातील सोन्याची चैनही काढुन घेतल्याचे सांगताच रिक्षाचालाकने साईच्या हातातील मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे साईने रिक्षातून उडी मारुन घरच्या दिशेने पळ काढून कसाबसा घरी पोहोचला. विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तांत्रिक बाबी, व सीसीटीव्ही फुटेज व साईने दिलेल्या वर्णनावरून आरोपीचा शोध सुरु केला असता पोलीस रेकॉर्डवरील तडीपार अजय मगरे याच्यावर संशय बळावल्याने पोलीस पथकाने त्याच्या राहत्या घरी जाऊन तपास केला असता त्याचा लहान भाऊ आरोपी सम्राट हा रिक्षाचालक असल्याचे समोर आले. त्यानंतर सिद्धार्थ नगर झोपडपट्टीमधून सापळा लाऊन ताब्यात घेतले.पोलीस ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याने गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व साईच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची ४५ हजार रुपयाची सोन्याच्या चैन हस्तगत करण्यात आली आहे.