
भर दिवसा ज्वेलर्स मालकावर चाकुचे वार
– सुदैवाने मालक बचावला, राम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दिनेश जाधव : डोंबिवली
वेषांतर करून एका ज्वेलर्सच्या दुकानात घुसलेल्या इसमाने ज्वेलर्सच्या मालकावर दिवसाढवळ्या चाकूने वार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दरम्यान मालकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारीमुळे चिंता व्यक्त केली जात असून या घटनेची नोंद राम नगर पोलीस ठण्यात करण्यात आली आहे.
डोंबिवली पूर्व येथील आगरकर रोडवर मन्ना ज्वेलर्स नावाचे सोन्याच्या दागिने विक्रीचा व्यवसाय करणारे दुकान आहे. याच दुकानात मंगळवारी सुमारे १२ वाजण्याच्या दरम्यान बुरखा घालून आलेल्या एका इसमाने तारकनाथ मन्ना यांच्यावर चाकूने वार केला आणि तेथून फरार झाला. सध्या त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून नेमका हा वार का करण्यात आला त्याची माहिती मिळाली नाही असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी सांगितले. या प्रकरणाचा आम्ही कसून शोध घेत असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.