
जिल्हा परिषद शिक्षकाला अपहरण करून लुटले
कल्याण मधील धक्कादायक प्रकार उघडकीस
कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दिनेश जाधव : कल्याण
ठाणे जिल्हा परिषदेच्या मलंगगड भागातील ढोके केंद्रावर शिकवणाऱ्या शिक्षकाचे अपहरण करण्यात आले. जगदीश पवार असे या शिक्षकांचे नाव असून बुधवारी सकाळी नियमितपणे ते आपल्या कल्याण पश्चिमेतील घरून ढोके जिल्हा परिषदेच्या शाळेत जात होते. मात्र सकाळी कल्याण पूर्वेतील नांदीवली परिसरात आरोपी प्रथमेश वाकुर्ले हा तरुण घरी जाण्यासाठी शिक्षक जगदीश पवार यांना हात करू लागला. शिक्षकाने देखील ओळखीचा तरुण असल्याने त्याना ढोके गावात जाण्यासाठी आपल्या चारचाकी वाहनात प्रवेश दिला.
यानंतर काही अंतरावर आरोपी प्रथमेश याने दोन साथीदारांना शिक्षकाच्या गाडीत घेतले. त्यानंतर या अपहरण कर्त्यांनी घेतले. त्यानंतर शिक्षक जगदीश पवार यांना महिलेशी संबंध असल्याच्या जाब विचारण्यासाठी तिच्या मामाकडे घेऊन जात असल्याचे सांगत त्यांच्या गळ्याला चाँपर लावून त्यांना बदलापूर परिसरातील मुळगावच्या पुढे असलेल्या एका जंगलात घेऊन गेले. त्यांनी शिक्षकाला कच्ची दारू पाजून त्याच्या खिशात असलेले पैसे गळ्यातील सोन्याची चैन काढून घेतले आणि फोन पे द्वारे पैसे ट्रान्स्फर करून घेतले. तसेच गळ्याला चाँपर लाऊन धार्मिक तेढ निर्माण होतील आणि महिलांना त्रास होईल असे व्हीडिओ तयार केले. पोलिसात तक्रार केली तर व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी या अपहरण कर्त्यांनी दिली होती. मात्र तक्रार करणार नाही असं सांगितल्यानंतर शिक्षकाला पुन्हा कल्याण परिसरात सोडले. त्यानंतर हे तिघे जण पसार झाले. दरम्यान झालेल्या घटनेची माहिती शिक्षक पवार यांनी आपल्या मित्रांसह पोलिसांना दिलीं. पोलिसांनी देखील तातडीने तपासाला सुरुवात करत घटनास्थळी भेट देत प्रकरण जाणून घेत गुन्हा दाखल केला आहे.