
ग्राहकांना फसवणाऱ्या साई श्रद्धा ज्वेलर्स वर गुन्हा दाखल
– २८ लाखाची केली फसवणूक
दिनेश जाधव : कल्याण
तारण ठेवलेले सोने आणि आकर्षक परतव्याचे आमिष दाखवून केलेल्या भिशी योजनेत ग्राहकाला तब्बल २८ लाखाला गंडा घालणाऱ्या कल्याण रामबाग येथील साई श्रद्धा ज्वेलरवर महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
श्रवणकुमार सोनी आणि रोहितकुमार सोनी अशी गुन्हा नोंद करण्यात आलेल्या ज्वेलर्स च्या मालकांची नावे आहेत. तर रामबाग येथे राहणाऱ्या आणि सेवा निवृत्त असलेल्या तुकाराम पाटील यांनी हा गुन्हा नोंद केला आहे. पाटील यांनी रामबाग लेन क्रमांक 4 येथे असणाऱ्या साई श्रद्धा ज्वेलर्सच्या दुकानात आपले 26 लाख 28 हजार 900 रुपये किमतीचे 875.03 ग्रॅम वजनाचे सोने तारण ठेवले होते. तसेच 2 लाख 63 हजार रुपये भिशी योजनेत गुंतवले होते. यावेळी ज्वेलर्सच्या मालकांनी विविध आमिष दाखवली त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून पाटील यांनी व्यवहार केला. मात्र भिशी योजनेसाठी दिलेली रोख रक्कम आणि तारण ठेवलेल्या सोन्याचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून फसवण्याची तक्रार पाटील यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात केली आहे. अधिक तपास महात्मा फुले पोलीस करत आहेत.