
बाजारपेठ पोलिसांनी आरोपीला घातल्या फिल्मी स्टाईल बेड्या
दिनेश जाधव : कल्याण
पोलिसांशी अनेक दिवस लपाछपी खेळणाऱ्या कुख्यात गुंडाला बाजारपेठ पोलिसांनी सिनेमा शैली प्रमाणे पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान या आरोपीला पकडताना पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
कल्याण पश्चिम येथील मजीद हाऊस मच्छी बाजार परिसरात राहणारा इब्राहीम इस्माईल मज्जित उर्फ पापा हड्डी असे या आरोपीचे नाव आहे. रामनवमीचा बंदोबस्त आटपून डिटेक्शन ब्रांच स्टाफ रात्री उशिरा जेवायला बसलेले असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक घोलप यांना एका गुप्त बातमी दराचा फोन आला. यावेळी इब्राहीम इस्माईल मजिद उर्फ पापा हड्डी हा आत्ताच राहते घरी आलेला आहे अशी माहिती गुप्त बातमीदारातर्फे देण्यात आली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक घोलप यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांच्या कानावर ही गोष्ट घातल्यानंतर त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक सापळा रचला. यावेळी आज हातातून आरोपी सुटता कामा नये यासाठी सर्व पोलिसांनी खबरदारी घ्यायची आहे असा सूचना देखील पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिल्या. परिस्थिती हातात बाहेर जाऊ नये यासाठी डीपी पथकाला देखील ताबडतोब सांगण्यात आले. पोलीस नाईक कातकडे व वैद्य तसेच सोबतीला महिला पोलिस खेमनार यांना सूचना करून आरोपीच्या घराला चारी बाजूने अतिशय गोपनीय सावध पद्धतीने पोलिसांनी वेढा घातला. मात्र पोलीस आल्याची चाहूल लागतात इब्राहिम इस्माईल याने चोर वाटेने घराच्या टेरेसवर जाऊन पुन्हा लपाछपीचा खेळ सुरू केला. इतकेच नव्हे तर टेरेस पलीकडील कट्ट्यावर अधांतरी लटकत लपलेल्या आरोपीने टेरेसवरून टेरेस पत्र्यावर उडी मारली. कोणाला दिसु नये म्हणुन संपुर्ण कपडे काढून मोठ्या शिताफीने काळ्याकुट्ट अंधारात जाऊन तो लपला. त्यावेळी पोलिस हवालदार जातक टेरेसवर पोलिस कर्मचाऱ्यांना सूचना देत होते. यावेळेस हवालदार जातक यांना तो पत्र्यावरच लपला असल्याचा दाट संशय होता. मात्र तो हाती लागत नसल्याने पोलीस कर्मचारी हवालदिल झाले. अखेर पोलीस नाईक सचिन साळवी यांना रात्रीच्या अंधारात त्याच्या हाताचे व पायाचे ठसे दिसले. त्यानंतर ठशांचा माग काढत आरोपी वरती पत्र्यावर लपला असल्याचे समजतात लागलीच पोलीस नाईक कैलास सांगळे यांनी आपली पावले त्याच्या दिशेने वळवली. मात्र चाहूल लागताच पापा हड्डी याने पंचवीस ते तीस फुट खोल असणाऱ्या घराच्या पत्र्यावर उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अनेक घरांचे पत्रे तुटले आणि प्रचंड आवाज झाल्याने घरांमधून लहान मुले आणि महिलावर्ग घाबरून बाहेर आले. त्यानंतर तो खाली उतरताच पोलीस शिपाई वैद्य यांच्या समोर येऊन तो उभा ठाकला. मात्र त्यांना देखील चकवा देऊन निसटून जाण्याचा त्याने प्रयत्न करताच पोलीस नाईक कातकडे यांनी आरोपीस धक्का देऊन खाली पाडले. मात्र पुन्हा उठून पोलिसांच्या अंगावर गाड्या ढकलून देत त्यांनी परत पळण्याचा पवित्रा घेतला. मात्र यावेळी परिसरातील गल्ली बोळ याची माहिती असलेले डिटेक्शन ब्रँचचे सचिन साळवी यांनी त्याला पळण्यापासून रोखले. यामध्ये पापा हड्डी याला बराच मार लागल्याने तो देखील हवालदिल झाला आणि पोलिसांना शरण आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक घोलप यांच्या पथकाला आरोपीच्या मुसक्या आवळण्यात अशा प्रकारे यश आले आहे. अधिक तपास बाजारपेठ पोलीस करत आहेत.