
मुंबईतील सराफाचे टिटवाळ्यात लुटले सव्वा कोटीचे दागिने
दिनेश जाधव : कल्याण
घडविलेले दागिने टिटवाळ्यातील जवाहिऱ्यांकडे विक्रीसाठी घेऊन आलेल्या मुंबईतील लालबाग विभागातील एका सराफाला दोन अनोळखी इसमांनी गुंगारा देत 1 कोटी 25 लाख रूपये किमतीची सोने दागिन्यांची पिशवी घेऊन पलायन केले. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. टिटवाळा पोलीस ठाण्यात सराफाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
राकेश अंबालाल जैन या मुंबईतील लालबागच्या सराफाने घडनावळ केलेले सोन्याचे दागिने टिटवाळा बाजारपेठेतील जवाहिऱ्यांना विकण्यासाठी आणले होते. ते कारमधून मंगळवारी संध्याकाळी टिटवाळ्यात आले होते. रिजन्सी हाॅटेलजवळ त्यांनी कार उभी केली. काही दागिने एका जवाहिऱ्याला ते देऊन पुन्हा कारजवळ आले. कारमध्ये सोन्याची पिशवी होती. राकेश यांना कारचे टायर पंक्चर असल्याचे दिसले. चालक, सराफ पंक्चरचा विचार करत असताना, दोन अज्ञात इसम दुचाकीवरून कारजवळ आले. त्यांनी कारमधील 2200 ग्रॅम सोन्याचे दागिने असलेली पिशवी घेऊन पळ काढला. राकेश, चालकांनी ओरडा केला. तोपर्यंत चोरटे सुसाट पळून गेले.
टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.