१०० दिवस कृती आराखड्याअंतर्गत ठाणे पोलिसांचा तक्रार निवारण दिन; ६४९ अर्जांची तात्काळ निर्गती
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : नागरिकांच्या तक्रारींचे जलद निराकरण करण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने १०० दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले. २३ आणि २४ मे रोजी झालेल्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला.
या तक्रार निवारण दिनासाठी एकूण १,१९० अर्जदारांना बोलाविण्यात आले होते. त्यापैकी ७१४ अर्जदार प्रत्यक्ष उपस्थित राहिले. कार्यक्रमाला ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्राप्त झालेल्या अर्जांपैकी ६४९ अर्जांची अर्जदारांच्या समक्ष तात्काळ निर्गती करण्यात आली. उर्वरित अर्जदारांनाही लवकरच बोलावून त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नागरिकांना प्रत्यक्ष बोलावून त्यांच्या तक्रारी ऐकून जागेवरच कार्यवाही आणि मार्गदर्शन केल्याने अर्जदारांनी समाधान व्यक्त केले. तसेच ठाणे शहर पोलिसांच्या या उपक्रमाचे नागरिकांनी विशेष कौतुक केले.
यासंदर्भातील माहिती जनसंपर्क अधिकारी तथा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली.