प्रेमसंबंधातून छळ; आयटी क्षेत्रातील तरुणीची नदीत उडी मारून आत्महत्या, तरुण अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : प्रेमसंबंधातून उच्चशिक्षित तरुणीला मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी खराडी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. मुंढवा पुलावरून मुळा-मुठा नदीपात्रात उडी मारून तरुणीने आत्महत्या केल्याची घटना ६ मे रोजी घडली होती. या प्रकरणी चैतन्य संजय कानडे (वय २३, रा. वडगाव शेरी) याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत मृत तरुणीच्या भावाने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणारी तरुणी ही मूळची सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील असून ती पुण्यातील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कार्यरत होती. उच्चशिक्षित असलेली ही तरुणी खराडी परिसरात वास्तव्यास होती.
६ मे रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास तिने मुंढवा पुलावरून मुळा-मुठा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली होती. सुरुवातीला या घटनेची अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. मात्र, तपासादरम्यान मृत तरुणीच्या भावाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
फिर्यादीनुसार, आरोपी चैतन्य कानडे हा तरुणीचा नातेवाईक असून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. चैतन्यच्या कुटुंबाचा वडगाव शेरी परिसरात पादत्राणांचा व्यवसाय आहे. प्रेमसंबंधानंतर आरोपीने तरुणीला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून बहिणीने आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माधुरी बिडवे करत आहेत.