पाम बीच रोडवर अपघातग्रस्त एसयूव्हीत ७० लाखांचे अफीम; गावठी कट्टा जप्त, चालक फरार

पाम बीच रोडवर अपघातग्रस्त एसयूव्हीत ७० लाखांचे अफीम; गावठी कट्टा जप्त, चालक फरार

पोलीस महानगर नेटवर्क

उरण : नवी मुंबईतील पाम बीच रोडवर भरधाव एसयूव्ही कारचा अपघात झाल्यानंतर पोलिसांनी वाहनातून तब्बल ७० लाख रुपये किमतीचे ६९ किलो अफीम आणि एक गावठी कट्टा जप्त केला. अपघातानंतर चालक वाहन घटनास्थळीच सोडून फरार झाल्याने पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. राजस्थान पासिंग असलेली एसयूव्ही पाम बीच रोडवरील ट्रॅफिक आयलंडला धडकली. अपघातानंतर चालकाने वाहन तिथेच सोडून पळ काढला, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भास्कर कोकरे यांनी दिली.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वाहनातून तीव्र उग्र वास येत असल्याने पोलिसांना संशय आला. त्यानंतर गाडीची झडती घेतली असता डिक्कीत ठेवलेल्या तीन गोण्यांमध्ये ६९ किलो अफीम आढळून आले. या अफीमची किंमत सुमारे ७० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तसेच वाहनाच्या डॅशबोर्डमध्ये एक लोड केलेला गावठी कट्टाही आढळून आला. पोलिसांनी अफीम, गावठी कट्टा आणि वाहन जप्त केले असून अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास सुरू असून, अफीमची वाहतूक कुठून आणि कुठे केली जात होती, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon