डुप्लिकेट सोन्याच्या आमिषाने फसवणूक; गर्दीत खिसेकापू करणारी टोळी जेरबंद

डुप्लिकेट सोन्याच्या आमिषाने फसवणूक; गर्दीत खिसेकापू करणारी टोळी जेरबंद

पोलीस महानगर नेटवर्क

लातूर : लातूर पोलीस च्या स्थानिक गुन्हे शाखेने डुप्लिकेट सोन्याचे बिस्कीट दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आणि गर्दीच्या ठिकाणी चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ५ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले आठ गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या सूचनेनुसार मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथक तपास करत होते.

दरम्यान, औसा-लातूर रोडवरील वासनगाव पाटी परिसरात काही जण डुप्लिकेट सोन्याचे बिस्कीट विक्रीसाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकून बाबाराव सूर्यकांत जाधव (३०), केशव छगन जाधव (५०) आणि संदीप दगडू जाधव (२९) या तिघांना ताब्यात घेतले. तिन्ही आरोपी हे सलगरा, ता. जि. लातूर येथील रहिवासी आहेत.

झडतीदरम्यान आरोपींकडून सोन्याचे मनी मंगळसूत्र, रोख रक्कम आणि सोनेरी रंगाचे डुप्लिकेट बिस्कीट जप्त करण्यात आले. चौकशीत आरोपींनी महिलांना सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केल्याची कबुली दिली. तसेच बसस्थानके, सरकारी रुग्णालय परिसर आणि इतर गर्दीच्या ठिकाणी खिसेकापू करून रोख रक्कम चोरी केल्याचेही उघड झाले.

या कारवाईत गांधी चौक, देवणी, अहमदपूर, शिवाजीनगर, कासार शिरसी, औसा, किनगाव आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यांतील गुन्ह्यांमधील १ लाख ७३ हजार रुपयांची रोख रक्कम आणि २२ ग्रॅम वजनाचे सुमारे ३ लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. आरोपी संदीप जाधव याच्यावर उदगीर शहर, औसा, देवणी, शिवाजीनगर, उदगीर आणि चाकूर पोलीस ठाण्यांतही फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक अक्षय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि प्रमोद देशमुख आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, अनोळखी व्यक्तींनी दिलेल्या सोन्याच्या आमिषांना बळी न पडता सतर्क राहावे, असे आवाहन लातूर पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon