
मनसे कल्याण शहर अध्यक्षाने केली चार करोडची फसवणूक
– जमीन मालकांचा आरोप महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
दिनेश जाधव : कल्याण
जमीन मालकाबरोबर भागीदारीमध्ये व्यवहार करूया असे सांगून बँकेच्या कागदपत्रावर जमीन मालकाच्या सह्या घेतल्या. त्यांनतर परस्पर एचडीएफसी बँकेचे खाते उघडून त्या खात्यात करोडोचा व्यवहार करणाऱ्या दोन बंधूंवर महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या दोन बंधूंनी तब्बल ४ कोटी ११ लाख २१ हजार ७५३ रुपयांची जमीन मालकाची फसवणूक केली असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून यातील एक बंधू मनसेचा कल्याण शहर अध्यक्ष आहे.
कौस्तुभ देसाई आणि कल्पेश देसाई या दोन्ही भावांनी फिर्यादी गणेश शंकर म्हात्रे यांची गौरीपाडा येथील एक जमीन भगिदरिमध्ये विकसित करू असे म्हात्रे याना सांगितले. ठरल्यानुसार व्यवहार करण्यासाठी एचडीएफसी बँकेचे खाते उघडावे लागेल असे सांगून एचडीएफसी बँकेच्या काही कागद पत्रांवर गणेश शंकर म्हात्रे यांच्या सह्या घेतल्या. मात्र काही दिवसांनी एचडीएफसी बँकेत खाते उघडण्यासाठी त्रास होत असल्याचे सांगत आपण जी.पी पारसिक बँकेत खाते उघडू असे म्हात्रे यांना सांगितले. त्यानुसार म्हात्रे यांनी होकार दिला. मात्र कौस्तुभ याने एचडीएफसी बँकेत आधीच खाते उघडले होते. त्यांनतर त्याने म्हात्रे यांना दाखवण्यासाठी जी पी पारसिक बँकेत देखील खाते उघडले. मात्र एचडीएफसी बँकेचे उघडलेल्या खात्याची कोणतीही माहिती म्हात्रे यांना नव्हती. मात्र दुसरीकडे देसाई बंधूंकडून एचडीएफसी बँकेत परस्पर व्यवहार करण्यात येत होते. म्हात्रे यांच्या सनदी लेखापालाला ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी ही बाब म्हात्रे यांच्या सांगितली. त्यानंतर म्हात्रे यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात कल्याण शहर मनसे कल्याण शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई आणि त्याचा भाऊ कल्पेश देसाई या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.