
मेहुणा ने केले सालीच्या दागिन्यांसह रोकडवर डल्ला विष्णूनगर पोलिसांनी केली अटक
दिनेश जाधव : डोंबिवली
बंद घर फोडून फ्रिजच्या कव्हरमधील चाव्यांच्या साह्याने कपाट/लॉकर साफ करून रोकडसह सोन्याचा ऐवज लांबविणाऱ्या दोघांना विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील एकजण अल्पवयीन असून यातील मुख्य आरोपी आपल्या सालीचे घर साफ करणारा मेहुणा असल्याचे चौकशीदरम्यान उघडकीस आले आहे.
पश्चिम डोंबिवलीच्या लोटेवाडी परिसरातल्या श्री बालाजी चाळीत राहणाऱ्या प्रतीक्षा गोपाळ जाधव (24) या तरूणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. शुक्रवारी सकाळी 7.30 ते रात्री 9 दरम्यानच्या कालावधीत या घरातून रोकाडसह सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून, तसेच गोपनीय माहिती काढून देवेंद्र रघुनाथ खांडेकर (22) याला तो राहत असलेल्या घाटकोपर पश्चिमेकडील संघर्ष नगरमधल्या साई संगम सोसायटीतून उचलले. देवेंद्रने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी एका 17 वर्षीय चोरट्याला साकीनाका येथून ताब्यात घेतले. यातील देवेंद्र खांडेकर हा तक्रारदार प्रतीक्षा जाधव हिचा नात्याने मेहुणा अर्थात बहिणीचा नवरा आहे.
-आतापर्यंत 33 हजारांचा मुद्देमाल हस्तगत-
प्रतीक्षा घरी नसताना तिचा मेहुणा देवेंद्र याने त्याच्या मित्राच्या मदतीने घराचा टाळा तोडला. त्यानंतर फ्रिजला लावलेल्या कव्हरमधील चाव्याच्या साह्याने किचनमधील कपाट आणि लॉकरमधील मंगळसूत्र, नथ, अंगठ्या व रोख रक्कम असा 99 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. चौकशीदरम्यान आतापर्यंत 33 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
-१९ मार्च पर्यत पोलीस कोठडी-
या आरोपी दुकलीकडून अशाप्रकारचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. यातील देवेंद्र खांडेकर याला अधिक चौकशीकरिता 19 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर त्याचा साथीदार अल्पवयीन असल्याचे त्याची रवानगी भिवंडीच्या बालसुधागृहात करण्यात आल्याचे वपोनि पंढरीनाथ भालेराव यांनी सांगितले.