
4 लाख रुपयाचे दागिने असलेली बॅग रेल्वेत विसरली
– पोलिसांच्या सतर्कतेमुळे बॅग महिलेकडे केली सुपूर्त
दिनेश जाधव : कल्याण
बदलापुरला जाणाऱ्या रेल्वे मध्ये प्रवास करणारी एक महिला बॅग गाडीतच विसरून उल्हासनगर स्थानकात उतरली. मात्र जवळपास 4 लाख 25 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज असणारी ही बॅग रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला परत मिळली आहे. यामुळे रेल्वे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नवी मुंबई येथे राहणाऱ्या शीतल गायकवाड या बदलापूरला जाणाऱ्या ट्रेन मध्ये चढल्यानंतर या महिलेने लाल रंगाची बॅग सामान ठेवण्याच्या रॅकमध्ये ठेवली होती. उल्हासनगर स्थानक आल्यानंतर ही महिला बॅग न घेताच उल्हासनगर स्थानकात उतरली. ट्रेन फलाटावरून सुटल्यानंतर या महिलेच्या लक्षात आले. तिने तत्काळ जाऊन रेल्वे पोलिसांना सांगितले. रेल्वे पोलीस मसने यांनी बदलापूर रेल्वे स्थानकात कामाला असणाऱ्या मसळे यांना संपर्क साधून बॅगेविषयी माहिती दिली.
मुंबईला जाणाऱ्या दिशेला असणाऱ्या पाहिल्या महिला जनरल डब्ब्यात असणारी लाल रंगाची बॅग मसळे यांनी ताब्यात घेतली. त्यानंतर या महिलेकडे ही बॅग सुपूर्त करण्यात आली. या बॅगेमध्ये साडेचार तोळ्यांचे गंठण, एक तोळ्याचे छोटे मंगळसूत्र, एक तोळ्याची चेन , एक ग्रॅम वजनाची छोटी चेन, कानातले, झुमके, कानातले वेल, सोन्याची नथ, सोन्याची बाली असे दागिने आणि जुने कपडे होते. यावेळी शीतल यांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानले.