
जागेच्या वादातून कंत्राटदारावर प्राणघातक हल्ला
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
दिनेश जाधव : कल्याण
टिटवाळा : जागेच्या वादातून एका बॉण्ड्री वॉल बांधणाऱ्या एका कंत्राटदारास बेदम मारहाण केल्याची घटना टिटवाळ्यात घडली आहे. सध्या कंत्राटदारावर कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू असून टिटवाळा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
अन्वर शेख असे उपचार घेणाऱ्या कंत्राटदाराचे नाव आहे. टिटवाळ्यातील मांडा परिसरात काही महिन्यांपासून जागेच्या मालकी हक्काचा वाद सुरु आहे. ज्या व्यक्तीच्या नावे ही जागा आहे, त्या व्यक्तीने आपल्या जागेवर बॉन्ड्री वॉल बांधण्याचे काम अन्वर शेख नावाच्या व्यक्तिला दिले होते. काल दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी अन्वर शेख पोहचले होते. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) गटाचे कल्याण जिल्हाध्यक्ष धर्मा वक्ते आणि समाजसेवक नरसिंग गायसमुद्रे हे उपस्थित होते. यावेळी काही लोकांनी अन्वर शेखसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांना तीन ते चार जणांनी लोखंडी सळईने बेदम मारहाण केली. सळईने त्याच्या डोक्यावर हल्ला करण्यात आला. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अन्वर शेख यांना उपचारासाठी कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी दोषींच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.