
पत्नीवर हल्ला करणाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न
पतीची प्रकृती चिंताजनक
दिनेश जाधव : डोंबिवली
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भररस्त्यात तिच्यावर चाकूने वार करून पसार झालेल्या आरोपी पती सोमनाथ देवकर (45) याने राहत्या घरात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज सकाळी दत्तनगर येथे घडली. यात आरोपी सोमनाथ हा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे रामनगर पोलीस ठाण्याचे वपोनी सचिन सांडभोर यांनी सांगितले.
डोंबिवली पुर्वेकडील दत्तनगर येथील गावदेवी मंदिराजवळ सोमनाथ व पत्नी वंदना राहतात.पत्नीच्या चारित्र्याच्या संशयातून पती-पत्नीमध्ये वाद होत होते. या वादातून मंगळवारी 8 फेब्रुवारी रोजी पुन्हा सोमनाथने पत्नीला मारहाण केली. याबाबत तक्रार देण्यास पोलीस ठाण्यात जाणाऱ्या पत्नीवर सोमनाथने भररस्त्यात चाकूने वार करत तिला जखमी करून पसार झाला होता. जखमी पत्नी वंदना हिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात सोमनाथ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सोमनाथ घटनेनंतर फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. आता याच दरम्यान सोमनाथ रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी आला. घराबाहेर लावलेले कुलूप तोडून तो घरात शिरला व त्याच्याजवळील बेकायदेशीर बंदुकीने स्वतःच्या छातीवर गोळी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात सोमनाथ गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान सोमनाथ याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांच्या माहिती नुसार, आरोपी सोमनाथ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर 3 विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. पत्नीवर वार करून तो नाशिक येथील जंगलात लपला होता. त्यानंतर रविवारी तो सकाळी घरी कोणीही नसताना येऊन त्याच्या जवळील बेकायदेशीर पिस्तूलाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही पिस्तूल आपण मध्यप्रदेशातून आणली असल्याचे त्याने पोलिसांजवळ दिलेल्या जबानीत सांगितले. तसेच त्याने सदर पिस्तूल कुणाकडून आणि कशासाठी आणले ? याचा पोलिस शोध घेत आहेत.